Pune News : ॲथलेटिक ट्रॅकचा वापर नेत्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी करून खेळाडूंचा अपमान

एमपीसी न्यूज : बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी मधील ॲथलेटिक ट्रॅकचा वापर आपल्या गाड्या उभ्या करण्यासाठी करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व खेळाडूंचा अपमान केला आहे. या प्रकाराबद्दल या नेत्यांनी समस्त खेळाडूंची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली आहे. राज्यात सत्ताधारी आहोत म्हणून मनमानी पद्धतीने वागण्याची सवय देखील आता आघाडी सरकारमधील नेत्यांनी बदलावी, असा सल्ला बिडकर यांनी दिला आहे. 

म्हाळुंगे – बालेवाडी या परिसरात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारले जाणार आहे. क्रीडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला हजेरी लावणाऱ्या या नेत्यांच्या गाड्यांचा ताफा चक्क मुख्य ॲथलेटिक्स स्टेडियमच्या ट्रॅकवर उभा करण्यात आला होता. बैठकीच्या ठिकाणी जाण्यास अडचण येऊ नये, यासाठी हा उद्योग करण्यात आला होता.

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ॲथलेटिकच्या ट्रॅकवर अशा पद्धतीने वाहनांचा ताफा उभा करणे ही मुजोरी आहे. आम्ही सत्ताधारी असल्याने आम्हाला कोणाची पर्वा नाही, या वृत्तीतून हे प्रकार घडत असून हा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही, असे सभागृह नेते बिडकर यांनी सांगितले. या बैठकीला काही मातब्बर नेते देखील उपस्थित होते.

क्रीडा संघटनेच्या महत्वाच्या पदावर त्यांनी काम केलेले आहे. अशा पद्धतीचे वर्तन त्यांना शोभणारे नाही. आघाडी सरकारच्या नेत्यांनी या चुकीबद्दल सर्व खेळाडूंची तसेच पुणेकरांची माफी मागावी. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून असा प्रकार पुन्हा घडणार नाही, अशी मागणी देखील सभागृह नेते बिडकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.