Interview With Mayor Murlidhar Mohol: जम्बो हॉस्पिटलबाबत हळूहळू विश्वास निर्माण होणार- महापौर मोहोळ

260 कोटी रुपये खर्च करून बांधलेले हॉस्पिटल सातत्याने वादग्रस्त ठरले. अखेर या रुग्णालयात आता पुणे महापालिकेतर्फे सुधारणांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आगामी काळात हळूहळू पुणेकरांमध्ये या हॉस्पिटलबाबत नक्कीच विश्वास निर्माण होईल

एमपीसी न्यूज (शाम सावंत)- पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) 800 खाटांचे हे सुसज्ज कोविड रुग्णालय 18 दिवसांच्या अत्यंत कमी वेळेत बांधून पूर्ण केले आहे.

मात्र, या रुग्णालयात पत्रकार पांडुरंग रायकर यांचा उपचारा अभावी मृत्यू झाल्यानंतर पुणेकरांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. 260 कोटी रुपये खर्च करून बांधलेले हॉस्पिटल सातत्याने वादग्रस्त ठरले. अखेर या रुग्णालयात आता पुणे महापालिकेतर्फे सुधारणांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आगामी काळात हळूहळू पुणेकरांमध्ये या हॉस्पिटलबाबत नक्कीच विश्वास निर्माण होईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ‘एमपीसी न्यूज’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. महापौरांशी साधलेला संवाद…

प्रश्न: पुणे महापालिकेतर्फे सध्या काय उपाययोजना सुरू आहेत?

उत्तर: सुरुवातीच्या काळात 800 बेडस तयार करून देणे अपेक्षित होते. ते ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून झाले नाही. या हॉस्पिटलचे काम पाहणाऱ्या एजन्सीवर तर कारवाई करण्यात आलेलीच आहे. संबंधित यंत्रणेवरही कारवाई होणे आवश्यक आहे. या हॉस्पिटलमध्ये ताबडतोब 800 बेडस सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत.

त्यामुळे आता बेड्सची संख्या हळूहळू वाढती आहे. आगामी काळात जम्बो कोविड सेंटरबाबत जे नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. ते दूर करून विश्वास निर्माण होणार आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांना तशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रश्न: आपण स्वतः अधिकाऱ्यांसोबत पीपीई किट घालून या हॉस्पिटलमध्ये पाहणी केली, तुमचा अनुभव कसा होता?

उत्तर: या ठिकाणी भेट दिल्यानंतर रुग्णांशी संवाद साधला. नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या. त्यांना प्रत्यक्षात व्हिडिओ कॉलिंग करण्याची सुविधा निर्माण केली. बाऊन्सर बंद केले.

त्या ठिकाणी महापालिकेचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यास सांगितले. आतमध्ये रुग्णांना चांगले जेवण मिळण्यासाठी आढावा घेण्यात आला. मेडिकल स्टाफ, डॉक्टर, नर्सेस व इतर स्टाफ तातडीने कार्यरत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रश्न: या हॉस्पिटलमध्ये उपचार होत नसल्याच्या तक्रारी आहेत?

उत्तर: जम्बो रुग्णालयाबद्दल गेल्या काही दिवसांत मोठ्या तक्रारी येत होत्या. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाही, उपचारांमध्ये दिरंगाई होते आणि सुविधा मिळत नाहीत, असे तक्रारींचे स्वरूप होते. म्हणूनच जम्बो हॉस्पिटलची परिस्थिती नेमकी काय आहे? इथली यंत्रणा कशी आहे?

_MPC_DIR_MPU_II

याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि रुग्ण, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आपण थेट जम्बो रुग्णालयात आढावा घेऊन विविध सूचना केल्या आहेत. आधीच्या एजन्सीचे काम काढून घेतल्यानंतर परिस्थिती बदलत असून समाधानाची स्थिती आहे. संबंधित एजन्सीवर कारवाईदेखील केली जाणार असून नव्या एजन्सीची नेमणूक केली आहे.

प्रश्न: महापालिकेने हे हॉस्पिटल ताब्यात घेतल्याने बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे का?

उत्तर: सुरुवातीच्या काळात या जम्बो हॉस्पिटलबाबत अनेक तक्रारी होत्या. पुणे महापालिकेतर्फे लक्ष घातल्यानंतर आता या रुग्णालयात चांगले उपचार होत असल्याने कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. याआधी रुग्णांच्या नातेवाईकांना भेटू दिलं जात नव्हतं, त्यावर आपल्या सुचनेनुसार दिवसातून तीन वेळा नातेवाईकांना संपर्क साधता येण्याची सुविधा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपलब्ध केली.

नातेवाईकांना सद्यस्थितीची माहिती दिली जाते. उपलब्ध औषधे आणि एम्ब्युलन्स याचाही माहिती घेतली आहे. शिवाय रुग्णांना दिलं जाणाऱ्या जेवणाचीही स्थिती स्वतः समजून घेतली. एकूणच परिस्थिती स्थिरावत असल्याचे चित्र आहे.

प्रश्न: हे हॉस्पिटल 100 टक्के क्षमतेने कधी सुरू होणार?

उत्तर: टप्प्या-टप्प्याने पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरु होत आहे. रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक बैठक घेऊन विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

प्रश्न: कोरोनाच्या संकट काळात पुणेकरांना काय आवाहन करणार ?

उत्तर: कोरोना झाला म्हणून घाबरण्याचे काहीही कारण नाही. आज शहरात 90 हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. वेळीच उपचार घेतले तर हा आजार सुद्धा बरा होऊ शकतो. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये. तर, काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायजर आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करतो.

प्रश्न: आपण स्वतः आजारावर मात केली आहे, तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे?

उत्तर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका अधिकारी – कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, साफसफाई कर्मचारी असे सर्वचजण 24 तास काम करीत आहेत. मागील 5 ते 6 महिन्यांपासून कोरोनाचे संकट आहे. त्याला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू आहेत.

त्याच दरम्यान मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, डॉक्टरांच्या उपचार आणि पुणेकरांच्या शुभेच्छांमुळे आपण या आजारावर मात केली आहे. आता पुणेकरांना या आजारातून मुक्त करण्यासाठी आपले काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.