Lonavala : देशपातळीवरील टाटा अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत किशोर गव्हाणे व नुपूर सिंग प्रथम

एमपीसी न्यूज – लोणावळा ते तिकोणा दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या देश पातळीवरील टाटा अल्ट्रा या 50 व 35 किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत किशोर गव्हाणे या स्पर्धकाने 3 तास 20 मिनिटे व 37 सेकंदात 50 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले तर महिला स्पर्धकांमधील नुपूर सिंग यांनी 4 तास 15 मिनिटे व 17 सेकंदात 50 किलोमीटरचे अंतर पार केले.

देशभरातील 1400 धावपटू या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये 200 महिला स्पर्धकांचा सहभाग होता. मागील वर्षी झालेल्या अल्ट्रा रनमधील सर्व भारतीय धावपटू तसेच आर्मीचे स्पर्धक आजच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. मागील तीन वर्षापासून लोणावळ्यात टाटा अल्ट्रा ही स्पर्धा आयोजित केली जाते. टाटा अल्ट्रा स्पर्धेतील पात्र खेळाडूंनाच जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याने ही स्पर्धा देशभरातील खेळाडूंना जागतिक स्तरावरील अल्ट्रा स्पर्धेत सहभागी होण्याकरिता महत्वाची असते, अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक व स्टायडर रेस डायरेक्टर दीपक लोंढे व अँथलेटिक फेडरेशन आँफ इंडियाचे आनंद मेनेजेस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेमधून जागतिक स्तरावरील गोल्डन लेव्हल ठरविता येते, सदरची स्पर्धा ही बीएसएफ मान्यताप्राप्त व एएफआयच्या नियमांप्रमाणे घेण्यात येते. भारतातील ही महत्वाची स्पर्धा असून दरवर्षी स्पर्धेत धावपटूंचा सहभाग वाढत आहे ही अभिमानास्पद बाब असल्याचे मेनेजेस यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.