Maval News :  सर्पदंशावर आंदर मावळात सोमवारी व्याख्यान व स्लाईडशो

एमपीसी न्यूज – विख्यात सर्पतज्ञ व जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य असलेल्या डाॅ सदानंद राऊत यांचे प्रथमच मावळ तालुक्यात जाहीर व्याख्यान व स्लाईडशो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सोमवारी (दि.15 नोव्हें.) सकाळी 11 वाजता आंदर मावळातील कुसवली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पार पडणार आहे.

ग्रुप ग्रामपंचायत कुसवली व येथील सहारा वृध्दाश्रमाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘सर्पदंश काळजी, प्रथमोपचार व इलाज’ हा त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य विषय असून माहितीपट व स्लाईड शोच्या माध्यमातून डाॅ. राऊत मार्गदर्शन करणार आहेत. मावळ तालुक्यात सर्पदंश व त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असून सापाबद्दल अनेक समज व गैरसमज आहेत त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना सर्पविषयक अधिक माहिती जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.

 

मुळचे सातारा येथील असलेले डाॅ राऊत हे गेली ३० वर्ष सर्पदंशावर उपचार व जनजागृतीचे काम करीत असून त्यांच्या कार्याची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा अभ्यास केला जातो . महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने देखील त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा विविध पुरस्काराने गौरव केलेला आहे.

दरम्यान, तालुक्यातील सर्व सरपंच , शिक्षक,अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांचा या कार्यक्रमासाठी विशेष सहभाग असणार आहे, अशी माहिती कुसवलीच्या सरपंच चंद्रभागा दाते व सहारा वृध्दाश्रमाचे विजय जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.