Khed News : शेतीची नुकसान भरपाई 15 दिवसात द्या, बाधित शेतक-याची ‘एलपीजी’ अधिका-याला नोटीस

एमपीसी न्यूज – लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) पाईपलाईनमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. सुमारे साडेपाच आर क्षेत्र पाईपलाईनने बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राची नुकसान भरपाई 15 दिवसात द्यावी, अशी नोटीस शेतकरी किसन गव्हाणे यांनी अॅड. सविता पाटोळे यांच्यामार्फत उरण चाकण-शिक्रापुर एलपीजी पाईपलाईन प्रकल्प अधिका-याला दिली आहे. भरपाई रक्कम न दिल्यास योग्य ती फौजदारी, दिवाणी स्वरुपाची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करण्यासाठी उरण ते चाकण-शिक्रापुर मार्गे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे जमिनीखालून पाईपलाईन टाकली आहे. त्यासाठी जमिनीचे संपादन केले. किसन गव्हाणे यांच्या मालकीची भोसे ता. खेड येथील गट नंबर 725, 4 वहिवाटीची जमीन आहे. हक्क नोंदणीस त्यांचे नाव आहे.

उरण चाकण-शिक्रापुर एलपीजी गॅस पाईपलाईन गव्हाणे यांच्या जमीनीतून जात असल्याने त्यांना नोटीसा पाठविल्या आहेत. जमीनीतील सुमारे साडेपाच आर क्षेत्र पाईपलाईनने बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राची नुकसान भरपाईची रक्कम दिली नसल्याचे आरोप करत गव्हाणे यांनी अॅड. सविता पाटोळे यांच्यामार्फत एलपीजी पाईपलाईन प्रकल्प अधिका-याला नोटीस दिली.

नोटिसीत म्हटले आहे की, बेकायदेशीरपणे जमीनीतून पाईपलाईनचे काम पूर्ण करुन टाकले. ही बाब गंभीर स्वरुपाची असून प्रचलित कायद्यातील तरतुदीचा भंग करणारी आहे. नुकसान भरपाई रकमेबाबत वेळोवेळी लेखी, तोंडी मागणी केली आहे. तथापि, गव्हाणे यांना उडवाउडवीची उत्तरे देवून नुकसान भरपाई रक्कम देण्याचे लांबणीवर टाकत आहेत. पाहणी करावयास येतो असे सांगून, तसेच तुमची कागदपत्रे वरच्या ऑफीसला पाठविली आहेत. तेथून आल्यानंतर तुम्हास नुकसान भरपाई देऊ असे संबंधित अधिकारी सांगत आहेत.

दिशाभूल करुन नुकसान भरपाई दिली जात नाही. जून 2017 पासून भरपाई दिली जात नाही. त्यामुळे गव्हाणे यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे कृत्य बेजबाबदारीचे, अपराधीक स्वरुपाचे, अन्याय करणारे, आर्थिक नुकसान करणारे ठरले आहे. नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत नुकसान भरपाई द्यावी. त्या रकमेवर जून 2017 पासून दरसाल दरशेकडा 18 टक्क्यांप्रमाणे व्याजाची नुकसान रक्कम गव्हाणे यांना द्यावी. भरपाई रक्कम न दिल्यास योग्य ती फौजदारी, दिवाणी स्वरुपाची कारवाई केली जाईल. त्यासाठीच्या खर्चाची, परिणामांची जबाबदारी, नोटीसीचा खर्च 5 हजार रुपये तुमच्यावर राहील असे नोटिसीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.