Lonavala : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात नाकाबंदी; शहरात येणार्‍या सर्व वाहनांची तपासणी

एमपीसी न्यूज – कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली असून लोणावळा शहरात व वरसोली टोलनाक्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे. लोणावळा शहरात येणार्‍या सर्व वाहनांची तपासणी पोलीस प्रशासनाने सुरु केली असून कामाशिवाय आलेल्यांना पुन्हा माघारी पाठविले जात आहे. दुचाकी चालकांची देखील कसोशीने चौकशी करत बिनकाम्यांना माघारी पाठविले जात आहे. तसेच संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा शहरासह कार्ला, वेहेरगाव, मळवली या भागात देखिल पोलीसांनी बंदोबस्त वाढविला असून चौकांमध्ये बसून बिनकामांची टिंगल-टवाळी करणार्‍या तरुणांना पोलीसांनी चोप दिला आहे.

रविवारी दिवसभर ‘जनता कर्फ्यू ‘ पाळल्यानंतर आज सकाळपासून नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला गेला. लोणावळा व ग्रामीण भागातील बहुतांश मुंबईकरांचे बंगले फुल झाले आहेत, या बंगलेधारकांकडे काम करणारे नागरिक हे स्थानिक असल्याने त्यांच्या माध्यमातून गावांमध्ये कोरोना आजाराचा संसर्ग होण्याच्या शक्यतेने गावांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील सर्व कंपन्या बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच बाजारभागात व हायवेवर चोरुन दुकाने व हाॅटेल, चायनिज, मॅग्गी पाँईट चालविणार्‍या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

लोणावळा शहरात अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही, शहरातील हे वातावरण असेच कायम राखण्याकरिता पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने कठोर पावले उचलावीत सर्व लोणावळेकर आपल्या सोबत आहेत, असे मेसेज आता सर्वत्र फिरु लागले आहेत. हुल्लडबाजी व सुचनाचे पालन न करणार्‍यांला कसलिही दयामाया न दाखवता कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.