Lonavala : पश्चिम भारतातील दुसर्‍या क्रमाक‍ांचे स्वच्छ शहर ‘लोणावळा’

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये लोणावळा शहराला पश्चिम भारतातील दुसर्‍या क्रमाकांचे स्वच्छ शहर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. दिल्ली येथे आज स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे केंद्रिय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते लोणावळा नगरपरिषदेला सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पर्यटन नगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहराचा आज दिल्लीत स्वच्छतेच्या बाबतीत देखिल डंका वाजला आहे.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, स्वच्छता व आरोग्य विभागाच्या सभापती संध्या खंडेलवाल, माजी सभापती पुजा गायकवाड, ब्रिंदा गणात्रा यांनी हा सन्मान स्विकारला. यावेळी मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे, म‍ावळ प्रबोधनीचे अध्यक्ष रविंद्र भेगडे, नगरसेवक राजु बच्चे, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब जाधव, रघुवीर शेलार, विज वितरण समितीचे सदस्य सुनील तावरे हे उपस्थित होते.

  • स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु होण्याच्या पूर्वीपासून म्हणजेच 2017 सालापासून लोणावळा शहरात स्वच्छतेचा जागर सुरु झाला होता. म‍ागील दोन वर्षात नगरपरिषदेने घरोघरचा कचरा शंभर टक्के गोळा करण्याचे शिवधनुष्य पेलले सोबतच शहरातील सर्व कचराकुंड्या काढत लोणावळा शंभर टक्के कचराकुंडी मुक्त बनविले. घरोघरी जाऊन नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिल्याने नागरिकांनी देखील शहर स्वच्छ करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

वरसोली येथील कचराडेपोवर बायोगॅस प्रकल्प तसेच कचर्‍यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविला. या सर्व कार्याची दखल घेत लोणावळा शहराला पश्चिम भारतातील दुसर्‍या क्रमाकांचे स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आहे. मागील वर्षी लोणावळा या स्पर्धेत सातव्या स्थानावर होते.

  • वर्षभराच्या काळात लोणावळा शहराने केलेली कामगिरी वाखण्याजोगी असल्याचे सांगत नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी लोणावळा शहरातील सर्व नागरिक व नगरपरिषदेचे सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व शहरातील विविध सामाजिक संघटना यांच्या सामुहिक प्रयत्नांचे हे यश असल्याचे सांगत सदरचा पुरस्कार या सर्व घटकांचा समर्पित करत असल्याचे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.