गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Lumpy Virus : शेतकऱ्यांनो लम्पीच्या पार्श्वभूमीवर बैलपोळा काळजीपूर्वक साजरा करा; आमदार सुनिल शेळके यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पशुपालन (Lumpy Virus) करीत आहे. परंतु, सध्या लम्पी या आजारामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व पशुपालकांनी बैलपोळा काळजीपूर्वक साजरा करावा, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे.

पशुधनावरील लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाच्या उपाययोजना व सद्यस्थितीबाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आमदार शेळके यांनी वडगाव मावळ येथे आढावा घेतला. यावेळी त्यांनी माहिती दिली.

शेतकरी आणि बैलांचे जिव्हाळ्याचे नाते घट्ट करणारा सण म्हणजे बैलपोळा. भारतासारख्या कृषी प्रधान देशात बैलपोळ्याचा दिवस हा बळीराजासाठी आनंदाची पर्वणी असते. परंतु, लम्पी आजारामुळे पशुधनाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनांची दखल घेऊन सर्व शेतकरी बांधवांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे. व या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी बैलपोळा काळजीपूर्वक साजरा करावा.

Lumpy Virus : शहरात 5 जनावरे लम्पी विषाणू बाधित; लसीकरण युद्धपातळीवर करणार

तालुक्यात आत्तापर्यंत सुमारे 15,543 जनावरांचे लसीकरण (Lumpy Virus) झाले आहे. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणावर लशीची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामुळे मावळातील लसीकरण मोहिमेला गती देण्यात येणार असून सर्व पशुपालकांनी जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण त्वरित करून घ्यावे. असे आवाहन देखील पशुपालकांना करण्यात आले आहे. तसेच, अधिकाधिक पशुपालक शेतकरी बांधवांना संपर्क करावा. आणि त्यांच्या मनात असणारे गैरसमज दूर करावेत, त्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करावी. अशा सुचना अधिकार्‍यांना बैठकी वेळी आमदार शेळके यांनी दिल्या.

यावेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, पशुधन विकास अधिकारी डॉ.ए.पी.देशपांडे, डॉ.अनिल परंडवाल, डॉ.रुपाली दडके, डॉ.अजय सुपे, डॉ.नितीन मगर, पशुधन पर्यवेक्षक दिपक राक्षे, शिकलगार यासीन, श्रीमती सीमा वाघमारे, डोबले आदि. उपस्थित होते.

Latest news
Related news