Mahalunge : व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; एकाला अटक

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील कुरुळी येथील एका व्यावसायिकाच्या मुलाचे (Mahalunge ) अपहरण करण्यात आले. हा प्रकार 24 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर या कालावधीत कुरुळी येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

गोरख जनार्दन फल्ले (वय 32, रा. केज, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार रोहित शिवाजी नागवसे (रा. केज, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी येथील एका व्यावसायिकाचा मुलगा कंपनीत गेला. तो रात्री पर्यंत घरी न आल्याने व्यावसायिकाने कंपनीत जाऊन पाहणी केली असता मुलगा तिथे दिसला नाही. तसेच कंपनीची कार आणि दुचाकी देखील दिसली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्या मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती.

त्यानंतर व्यावसायिकाचा मुलगा वापरत (Mahalunge ) असलेली दुचाकी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे बेवारस मिळून आली. पोलिसांनी व्यावसायिकाच्या कंपनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कंपनीच्या मागील बाजूला राहणारा आरोपी रोहित याच्यासोबत व्यावसायिकाचा मुलगा एका हॉटेलमध्ये जेवण करत होता.

त्यानंतर रोहित देखील बेपत्ता होता. त्यामुळे रोहित आणि त्याच्या साथीदाराने व्यावसायिकाच्या मुलाचा घातपात करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : गुलटेकडी कॅनॉल येथे मुलगा बुडाला, शोध सुरु

दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी गोरख फल्ले याला अटक केली आहे. अपहरण का केले, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.