Maharashtra Corona Update : राज्यात 3 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण; आज 35,726 रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 35 हजार 726 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 26 लाख 73 हजार 461 एवढी झाली असून, त्यापैकी 23 लाख 14 हजार 579 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आज दिवसभरात 14 हजार 523 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.2 टक्के एवढं झाले आहे.

सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून सध्या 3 लाख 03 हजार 475 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात सर्वाधिक 56 हजार 849 सक्रिय रुग्ण आहेत.

त्याखालोखाल. नागपूर मध्ये 40 हजार 527 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड व अकोला जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे.

राज्यात आज दिवसभरात 166 रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील कोरोना मृतांची संख्या 54 हजार 073 एवढी झाली आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.02 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या 14 लाख 88 हजार 701 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 15 हजार 644 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आज शनिवार मध्यरात्रीपासून राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री आठ ते सकाळी सात या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येता येणार नाही. पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत.

राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सिनेमाहॉल, मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट देखील रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत बंद राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.