Mumbai News : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण पूर्ण करण्याची संधी द्या – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रात परतलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काही नियम शिथिल करुन देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली जावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

मुंबईत विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात युक्रेनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या समस्येकडे आमदार लांडगे यांनी महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधले. आमदार लांडगे म्हणाले की, युक्रेनमधून महराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भिती आहे, तसेच आर्थिक नुकसानही होणार आहे. परिणामी, संबंधित पालक आणि विद्यार्थी तणावात आहेत.

पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरातील 34 विद्यार्थी युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. मात्र, तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे ते पुन्हा भारतात परतले आहेत. आता त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक देखील चिंतेत आहे. विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे मेडिकलचे शिक्षण अपूर्ण राहू नये. यासाठी संबंधित विद्यार्थी भारतातून इंटर्नशिप करु शकतील, असे अध्यादेश केंद्र सरकारने काढले आहेत. त्या धर्तीवर महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांना एखाद्या शासकीय किंवा खासगी शिक्षण संस्थेमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि इंटर्नशिप पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही आणि आर्थिक नियोजनही कोलमडणार नाही. याबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षीत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुन पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.