Pimpri News : शाळा, महाविद्यालयांमध्ये फिरते लसीकरण केंद्र सुरू करा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाढता कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी तसेच, शाळा- महाविद्यालयांमध्ये फिरते लसीकरण केंद्र सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वतंत्र केंद्रांची निर्मिती केली आहे. शहरात 4 जानेवारी 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्याला पालक आणि मुलांचा प्रतिसाद मिळत आहे.

मात्र, सध्यस्थितीला महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांत केवळ लसीकरण केंद्र सुरू आहेत. एका केंद्रावर दररोज 500 डोस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात नियमित केंद्र सुरू राहिले तर दररोज केवळ 4 हजार मुलांना लसीकरण केले जाते. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणे क्रमप्राप्त आहे. शहरातील कोविड रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोविड बाधित रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासनाने 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी केंद्रांची संख्या आणि लसीची उपलब्धता वाढवावी.

पालक आणि मुलांच्या सोयीसाठी महापालिका प्रशासनाने शाळा-महाविद्यालयांमध्ये फिरते लसीकरण सुविधा सुरू करावी. ज्यामुळे जास्तीत-जास्त मुलांना लस घेता येईल. पिंपरी-चिंचवड कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने आपण सकारात्मक निर्णय घेवून तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.