Dagdushet Ganapati : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांची निवड

एमपीसी न्यूज – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस माणिक चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली.गुरुवार (दि.15) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील 2 वर्षांकरीता माणिक चव्हाण यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी हेमंत रासने यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, अक्षय गोडसे, अमोल केदारी, कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे आदी उपस्थित होते.माणिक चव्हाण हे ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.माणिक चव्हाण हे ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ  कायमच सक्रिय सहभागी असतात.तसेच कोविड काळात ट्रस्टने केलेल्या मदतकार्यात देखील स्वत: रस्त्यावर उतरुन त्यांनी सहभाग घेतला होता.

ट्रस्टने यापूर्वी घोषणा केल्यानुसार 15 सप्टेंबर रोजी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत  हा निर्णय घेण्यात आला आहे.सन 2022 ते 2024 याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे हे वरील पदांवर कार्यरत राहणार आहेत.

पुढील 14 वर्षांचे नियोजीत अध्यक्ष

सन 2022 ते 24 याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण, सन 2024 ते 2026 अशा पुढील दोन वर्षांकरीता ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने, सन 2026 ते 2031 या पुढील पाच वर्षांकरीता महेश सूर्यवंशी आणि सन 2031 ते 2036 या त्या पुढील पाच वर्षांकरीता हेमंत रासने हे ट्रस्टचे अध्यक्षपद भूषविणार असल्याचा महत्वाचा निर्णय देखील एकमताने घेण्यात आला आहे.या माध्यमातून पुढील 14 वर्षांचे नियोजीत अध्यक्ष देखील यावेळी एकमताने ठरविण्यात आले. बैठकीनंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.