Manobodh by Priya Shende Part 18 : मनोबोध भाग 18 – मना राघवेवीण आशा नको रे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक अठरा.

मना राघवेवीण आशा नको रे
मना मानवाची नको कीर्ती तुरे
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे

या श्लोकात समर्थ आपल्याला भक्तीचा प्रकार नामस्मरणाची शिकवण देत आहेत. मला राघवेवीण आशा नको रे. ते मनाला बजावत आहेत की हे मना तू राघवा शिवाय, श्रीरामा शिवाय, परमेश्वराशिवाय कोणताच विचार मनात आणू नकोस. तू फक्त त्याचं नामस्मरण कर. स्तुती कर. त्याच्याशिवाय कसलीच आस नको. त्याचाच ध्यास धर कारण तोच तुला तालणार आहे.तो खूप दयाळू आहे. कनवाळू आहे. तर त्याला शरण जा. तो तुला मोक्षाकडे नेणारा आहे.

पुढे समर्थ म्हणतात की “मना मानवाची नको कीर्ति तुरे।”म्हणजे परमेश्वराला तू आपलं मान त्याची भक्ती कर. त्याची स्तुती कर. बाकी माणसाची उगीच स्तुती करू नकोस. काही लोक अशी असतात की गोड बोलून दुसर्‍याची स्तुती करून आपलं काम काढून घेतात.संसारात अडीअडचणीत बरोबर आपली संधी साधून घेतात. दुसऱ्याचे स्तुति करून.

समर्थ सांगताहेत की तू अशी कोणाची खोटी वारेमाप स्तुती करून माणसांकडून काम काढून घेऊ नकोस स्वतःचा स्वार्थ त्यात आणू नकोस ते तात्पुरतंतुझं काम करतील किंवा त्या आनंदाचा तुला फक्त तात्पुरता फायदा होईल. राघवाची प्रीती धरलीसत्याचं भजन पूजन तू केलंस तर तुला खरा आनंद प्राप्त होईल. आणि तुझी मोक्षाकडे वाटचाल चालू होईल.

इथे इसापनिती ची गोष्ट आठवते. कोल्हा आणि कावळ्याची. कावळ्याला एकदा मोठा चीजचा तुकडा मिळतो. आनंदात तो झाडावर जाऊन बसतो. तेवढ्यात एक कोल्हा तिकडून जात असतो. त्याचं लक्ष त्या कावळ्याच्या चोचीतल्या चीजच्या तुकड्याकडे जातं. त्याच्या मनात लालसा निर्माण होते. आणि मग ते कसं काढून घ्यावं असा तो विचार करतो.

त्याला कल्पना सुचते आणि तो कावळ्याला म्हणतो की, तू इतका सुंदर आहेस, तर तुझा आवाज किती सुंदर असेल. तुझा आवाज ऐकव ना. असं ऐकल्यावर कावळा काव काव करतो. आणि कोल्ह्याला हवा असणारा चीजचा तुकडा तो खाऊन आनंदी होतो. तर असे कोल्हे माणसांमध्ये पण आहेत. जे आपला स्वार्थ साधण्यासाठी स्तुती करतात. त्यासाठी समर्थ म्हणतात की, तू माणसाची स्तुती करू नकोस.

राघवाची भक्ती कर पुढे ते म्हणतात की, परमेश्वर हा सर्वत्र आहे, तो सर्वव्यापी आहे. त्याला सगळे मानतात. त्यांची वर्णनही वेद, उपनिषदे, शास्त्रे, पुराणं यात आढळतात. ज्याची वर्णन इतक्या पुरातन काळापासून केली आहेत अशा भगवंताच्या चरणी तू लीन हो. त्यात आनंद आणि समाधान मिळेल.

परमेश्वराची भक्ती करताना त्याचं नामस्मरण करत असताना कोणतेही काम केलं किंवा कर्म केलं तर ते नीतिमान म्हणजे श्लाघ्यं असतं.असच समर्थ सांगताहेत. कारण नीतीनं एक कर्म केलं तर आपण विवेकाने वागतो आणि विवेकाच्या मदतीनं आपण भगवंताचे नामस्मरण करायला प्रवृत्त होतो. त्यातूनच चिरंतनाचा आनंद मिळवू शकतो म्हणूनच परमेश्वराचं नामस्मरण किंवा गुणगान हे महत्वाचं आहे, असं समर्थ सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.