Manobodh by Priya Shende Part 19 : मनोबोध भाग 19 – मना सर्वथा सत्य सोडू नको रे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक एकोणीस.

मना सर्वथा सत्य सोडू नको रे

मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे

मना सत्य ते सत्य वाचे वदावे

मन मिथ्य ते मिथ्य सोडूनी द्यावे

या श्लोकात समर्थांनी एका मोठ्या गोष्टीवर भाष्य केलं आहे. ते म्हणत आहेत की “मना सर्वथा सत्य सोडू नको रे
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे”.

आता हे सत्य आणि मिथ्य काय आहे ते आपण पाहूयात. या जगात दोनच गोष्टी आहेत. सत्य म्हणजे परमेश्वर,भगवंत आणि मिथ्य म्हणजे मोह मायेचा पसारा.

समर्थ सांगताहेत की “मना सर्वथा सत्य सोडू नको रे.” म्हणजेच सत्य जे की, परमेश्वर आहे त्याला तू सोडू नकोस. त्याचा ध्यास धर. त्याची भक्ती कर. त्याची जीवाला आस लागू दे. त्याचीच प्रीती धर. त्याची जीवाला तळमळ लागू दे. त्याच्या जवळ जा. त्याच्या चरणाशी लीन हो. त्याला शरण जा. सतत त्याचं नामस्मरण कर. भजन, कीर्तन, सत्संग यात तू रमून जा. ते पण सगळं निरपेक्षपणे कर. तो परमेश्वरच फक्त तुला पुढची वाटचाल दाखवेल. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढेल. मोक्ष ही अंतिम पायरी आहे.

हि पायरी अत्यंत उच्च आहे. तिथे घेऊन जाणारा फक्त तो ईश्वरच आहे. खरा आनंद आणि समाधान त्याच्या भक्ती आणि प्रीतीतच आहे. तर तू फक्त परमेश्वराचे चिंतन, भजन-पूजन करत जा. तो एकमेव सत्य आहे.

पुढे ते म्हणत आहेत की “मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे”. इथे मिथ्य म्हणजे मोहमाया अर्थात मायेचा पसारा. या प्रपंचात माणूस इतका अडकून पडतो, कि त्याला परमेश्वराची भक्ती करायला वेळच मिळत नाही. संत कबीर यांनी म्हटलंय की ,

अपना तो कोई नही, देखा ठोकी बजाय
अपना अपना क्या करे, मोह भरम लिपटाय

या संसारात आपलं कोणी नाही हे आपण जाणतो. त्यामुळे माझं माझं करणं व्यर्थ आहे. तरीपण सर्वजण या मोहमायेत अडकलेले आहेत. मायेच्या जाळ्यात गुरफटले आहेत. “मोहमाया को तजके, प्रभुराम को भजन ले, पार करेगी तेरी नाव रे”. माणसाला मनात इच्छा असली तरी संसारातून वेळ काढता येत नाही. तो इतका मायेच्या पसार्‍यात गुरफटून जातो की त्याला उपासनेसाठी वेळ राहत नाही. त्याची इच्छा असूनही, वेळ काढू शकत नाही. कारण तो मोहमायेच्या जाळ्यात गुरफटून जातो. संसाराच्या अडीअडचणी सोडविण्यात आणि ऐहिक सुखाच्या मागे लागून ते मिळवण्यात आणि उपभोग घेण्यात त्याचा आयुष्य सरून जातं. अनंत अडचणी, चिंता, दुःख ह्यात तो व्याकुळ होऊन बसतो आणि आपला खरा आनंद तो विसरून जातो. लहानपणी त्याची जाणीव नसते, म्हणून भक्ती राहते. तरूणपणी नोकरी, लग्नं, मुलं-बाळं यामधून त्याला वेळच होत नाही. पुढे संसारातील कर्तव्य, मुलं-बाळं त्यांचे शिक्षण, त्यांची लग्न, नातवंड पतवंड यामध्ये तो गुंतून जातो. त्याला बघती उपास आता करायला वेळच राहत नाही. माणसाचा प्रपंचात गोंधळ काही थांबत नाही. आणि तो संसारीक ऐहिक सुखाच्या मागे लागतो. आणि खरा आनंद घ्यायचा पूर्ण विसरून जातो. तरी काहीजण वेळ काढायचा प्रयत्न करतात, मोहमायेच्या पसारा यावर मात न करता आल्याने त्यामध्येच अडकतात. उपासना करण्याचं राहूनच जातं.

पुढे समर्थ म्हणताहेत की “मना सत्य ते सत्य वाचे वदावे. मना मिथ्य ते मिथ्य सोडूनी द्यावे”. सत्य म्हणजे परमेश्वर. समर्थ मनाला सांगत आहेत हे मना, तू परमेश्वराची म्हणजे सत्याची कास धर. उपासना कर नामस्मरण कर. आणि या संसाराच्या रहाटगाडग्या मधून बाहेर पडून परमेश्वराला भज. त्याच्या चरणी लीन हो. म्हणजे तुला चिरंतन आनंद आणि खरं समाधान लाभेल. तात्पुरत्या ऐहिक सुखाला तू आनंद मानू नकोस. खरा आनंदाची कास धर. म्हणजे तुला मोक्षाची प्राप्ती होईल. जे की माणसाचं अंतिम ध्येय असायला हवं.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.