Manobodh by Priya Shende Part 25 : मनोबोध भाग 25 – मला वीट मानू नको बोलण्याचा

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक चोवीस

मना वीट मानू नको बोलण्याचा

पुढे मागुता राम जोडेल कैचा?

सुखाची घडी लोटता दुःख आहे

पुढे सर्व जाईल काही न राहे

आत्तापर्यंत समर्थांनी अनेक श्लोकांमधून मनाला सतत उपदेश दिले आहेत. तू हे कर. तू ते करू नको. समर्थांना या श्लोकात उगीचच शंका येते आहे की सारखं सारखं तेच ऐकून हे मना, तुला माझ्या बोलण्याचा वीट म्हणजे कंटाळा तर येत नाही ना?

“मना वीट मानू नको बोलण्याचा”, म्हणजे समर्थ म्हणत आहेत की हे मना, मी हे काही सारखं सारखं तुला काय कर किंवा काय करू नकोस हे सतत सांगतोय, बजावतोय त्याचा तू वीट मानून घेऊ नकोस. कारण हे मी सगळं तुझ्या भल्यासाठी सांगतोय. कारण तुझं परमेश्वराशी नातं जोडण्यासाठी मी हे मार्गदर्शन करत आहे, ज्यात तुझंच भलं होणार आहे. तर तू माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस.

रोज रोज तोच उपदेश केला की नकोसा वाटतो. जसं की लहान मुलाला आई सारखी सूचना देत असते, चॉकलेट खाऊ नको, खोटं बोलू नको, वडीलधाऱ्यांचा मान राखावा. चांगला अभ्यास कर. हे रोज रोज तेच तेच बोलल्यावर मुलगा चिडतो, तेव्हा आई सांगते की, तू रडू नकोस बाळा. हे मी तुझ्या चांगल्यासाठी सांगते आहे. तुला चांगल्या सवयी लागाव्यात, शिस्त अंगात बाणावी. परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होत गेला म्हणजे, चांगलं शिक्षण पूर्ण करून, तुझ्या तुझ्या मार्गाला लागशील. यासाठी मी आता बोलते, त्याचा राग मानू नकोस.

कारण रोज एक एक क्षण वाया जातोय. असा वेळ वाया घालवला तर, पश्चात्तापाखेरीज हातात काही उरणार नाही. पुढे समर्थ म्हणत आहेत की,”पुढे मागुता राम जोडेल कैचा”? ते म्हणत आहेत, मी तुझं भलं व्हावं, यासाठी तुला सतत उपदेश करतोय. त्याचा जर तू कंटाळा केला, असं वेळ वाया घालवला तर, तुझं रामाशी नातं कसं जुळेल? त्या परमेश्वराचे नातं कसं जुळणार? कारण तोच तुला आनंद देणारा आहे. मनाला शांती मिळवून देणारा आहे. सुख प्राप्त करून देणार आहे. तर तु ऐहिक सुखाच्या मागे न धावता खरा आनंद जयामध्ये आहे त्याच्याशी म्हणजे ईश्वराशी नातं जोड.

पुढे समर्थ म्हणतात आहे की, “सुखाची घडी लोटता दुःख आहे”. हे मना तू जर फक्त ऐहीक सुखाच्या मागे धावत सुटलास, तर तुझ्या वाट्याला दुःख हे येणारच आहे. कारण ऐहीक सुख, हे क्षणभंगुर आहे. त्याच्या पाठोपाठ दुःख हे, आहेच आहे. कारण ऐहीक सुखात समाधान नाही. लोभामुळे, मोहमायेमुळे, आहे त्यात समाधान न मानता, माणसाला सतत काहीतरी अजून हवं आहे आणि मग ते मिळालं नाही की दुःख सुरू. दुसऱ्या कडचं सुख, हे मला मिळत नाही. हे कळलं की ईर्षा सुरू. दुःख सुरू. तर असली दुःख संपवायची असतील तर, आपली नाळ परमेश्वराशी जोड. त्यात खरं सुख आहे. असं समर्थ सांगताहेत.

नाहीतर जन्ममृत्यूच्या फेर्‍यात तू अडकून पडशील आणि हेच तुझं जीवन आहे तर, त्याला नामस्मरणाची जोड दे. तुझं बालपण, तारुण्य, वार्धक्य हे कोणी थांबू शकत नाही. काळ पुढे चालतच राहतो. पण तुला नामस्मरणाची गोडी लागली नाही, तू ईश्वराचं नावच घेतलं नाहीस तर, ह्या जन्ममृत्यूच्या फेर्‍यातलं गरगर फिरणं, तसंच चालू राहील आणि सगळं पुढे जाईल. तुझ्या हातात काहीच राहणार नाही. “पुढे सर्व जाईल काही न राहे”. तर तू वेळीच देवाशी नातं जोड. असं समर्थ सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.