Manobodh by Priya Shende Part 5 : मनोबोध भाग 5 – मना पाप संकल्प सोडोनी द्यावा

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक पाच

मना पाप संकल्प सोडून द्यावा

मना सत्यसंकल्प जीवि धरावा

मना कल्पना ते नको विषयांची

विकारे घडे हो जनी सर्व ची ची

मना पाप संकल्प सोडून द्यावा, कसा आहे की, वाईट गोष्टींकडे किंवा पापाकडे मन पटकन आकृष्ट होतं. त्यासाठी समर्थांनी मनाला बजावलं आहे की, बाबा रे पाप संकल्प सोडून दे, आणि सत्याचा संकल्प आचरणात आण.

सत्यसंकल्प म्हणजेच लोककल्याण, सद्विचार, सदाचरण असा अर्थ अभिप्रेत असावा.

समर्थ मनाला बजावतात की, शरीरसुखाची, इंद्रिय सुखाची, विषयांची कल्पनासुद्धा करू नये. कारण, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या षड्रिपू मुळे माणसाची प्रगती होत नाही, तर उलट अधोगतीच होते. हे विकार माणसाला जडले तर इतर लोकात छीः थू होते असे समर्थांनी सांगितले आहे.

आपण कित्येकदा या विषय वासनेमुळे कुटुंबाची वाताहत होताना पाहिली आहे. पूर्वापार ही उदाहरणे आपण बघत आहोत. विश्वामित्रां सारखा तपस्वी सुद्धा मेनके मुळे हुरळून जाऊन त्यांची तपस्या भंग झाली. रावण एवढा मोठा शिवभक्त, पण परस्त्रीचा मोह त्यालाही आवरला नाही. आजकाल सुद्धा नोकरी किंवा व्यवसायामध्ये परस्त्री विषयी लालसा दिसतेच.

कित्येक माणसं त्यांच्या मोहापायी, विकारा पायी, व्यसनांपायी रसातळाला गेलेली आहेत. त्यामुळे त्यांची समाजात चांगली प्रतिमा राहत नाही. लोक छीः थू करतात.

म्हणूनच, पाप संकल्प सोडून, सत्य संकल्प म्हणजेच सदाचरणाचा मार्ग अवलंबावा आणि वाईट सवयी, वासना यांना मनात जरासुद्धा थारा देऊ नये.. म्हणजे लोक दुरावणार नाहीत.

समर्थ वारंवार मनाला बजावताना उपदेश करतात की, स्वतःच्या मनावर पाप बुद्धीला थारा देऊ नकोस, कारण ते शिकवावे लागत नाहीत. आपल्या मनात सतत येणाऱ्या चांगल्या-वाईट विचारांमधून चांगले विचार रुजवायला वेळ लागतो आणि वाईट विचार मनातून जायला वेळ लागतो. सत्य संकल्पासाठी तयार राहावं, त्यातच मग्न राहावं, म्हणजे मग, रिकामं डोकं शैतानाचे घर होणार नाही आणि नको त्या इच्छा-आकांक्षा मनात डोकावणार नाहीत.

मनात वाईट विचार आले की, तशीच क्रिया पण घडते आणि मग तात्पुरतं काहीतरी, झटपट मिळवण्यासाठी, क्षणिक सुखासाठी माणूस काही ना काही पाप करतो. मग ती चोरी असेल, असत्य बोलणं असेल, द्वेष,हिंसा, पैशाची लालूच, व्यसन असेल.. हे सर्व केलं तर जनमानसांत माणसाची पत राहणार नाही आणि माणूस निंदा-नालस्ती अपमानाचा विषय होऊन बसेल.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.