Manobodh by Priya Shende Part 60 : मना राम कल्पतरू कामधेनू

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 60 (Manobodh by Priya Shende Part 60)

मना राम कल्पतरू कामधेनू

निधी सार चिंतामणी काय वानू

जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता

तया साम्यता कायसी कोणी आता?

(Manobodh by Priya Shende Part 60) या श्लोकात समर्थांनी भगवंताच्या मोठेपणाचं वर्णन करताना, त्याला काय म्हणावं कल्पतरु की कामधेनू?

आपल्या मनातल्या इच्छा पूर्णत्वाला नेणारा वृक्ष म्हणजे हा कल्पतरू. या वृक्षाच्या छायेत बसल्यावर जी कोणती इच्छा मनात येते ती तात्काळ पूर्ण होते. तशाही आपल्या इच्छा आहे ह्या संसार सुखाच्या तर असतात. पण त्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात.  आपण नुसती कल्पना जरी केली ह्या कल्पतरूची, तरी केवढा दिलासा मिळतो. खरंच कोणी असं असेल का, जे आपल्या इच्छा तात्काळ पूर्ण करेल. जसा हा कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष तशीच कामधेनु.

Smart City Mission : नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘सबका भारत, निखरता भारत’ उपक्रमात सहभागी व्हा; महापालिकेचे आवाहन

कामधेनु म्हणजे अशीच आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करते अशी दिव्य गाय. अशी कामधेनू वसिष्ठ ऋषींकडे होती.  ती गाय विश्वामित्र ऋषींनी बळजबरीनं नेण्याचा प्रयत्न केला.  पण त्या दिव्यशक्ती असलेल्या गायीमुळे आणि वसिष्ठांच्या तपोबलामुळे विश्वामित्र ऋषींचा हा प्रयत्न वाया गेला. समर्थ म्हणताहेत की परमेश्वराला कशाची उपमा देऊ?

पुढे समर्थ म्हणताहेत की त्या परमेश्वराला निधी सार म्हणजे कुबेर असं म्हणू का? कुबेर असतं अक्षय असतं. त्यातून काही खर्च जरी झालं तरी, ते परत आहे तेवढेच असतं. ते कधी संपत नाही.  म्हणूनच समर्थ म्हणत आहेत की त्या परमेश्वराला कुबेराचं धन म्हणू का? चिंतामणी असं म्हणू? चिंतामणी म्हणजे असं रत्न की ज्याच्या प्राप्तीने सर्व चिंता दूर होतात. त्याच्या सहवासाने सगळ्या चिंता, काळज्या, दुःख दूर होतात असं म्हटलं जातं.

म्हणून समर्थ विचारत आहे की या परमेश्वराचं वर्णन कसं करू? त्याचे गुण कसे सांगू? त्याचं वर्णन करताना शब्द अपुरे पडतात.  त्याला कल्पतरू म्हणू, कामधेनु म्हणू? त्याला कुबेराचं धन म्हणू? की चिंतामणी म्हणू?

Facebook Dindi : यंदा फेसबुक दिडींचा अनोखा उपक्रम, अनुभवता येणार ‘वारीतला पोशिंदा’

परमेश्वराचं वर्णन करायला ह्या उपमा पण कमी पडतील. असा तो ईश्वर वर्णनातीत आहे. ह्या परमेश्वरा मुळेच हे विश्व, जग अस्तित्वात आहे.  कल्पवृक्ष, कामधेनू, कुबेर, चिंतामणी यांची निर्मिती पण याच परमेश्वराने केली आहे. या सर्व दिव्य गोष्टींनी जर आपली इच्छा पूर्ण होणार असतील, तर परमेश्वराच्या कृपेने, त्याच्या सहवासाने, त्याच्या प्राप्तीने तर, इच्छाच उरणार नाही. कसली दुःखही राहणार नाही.

त्यामुळे या विश्वाच्या निर्मात्याची कोणाशीच तुलना होऊ शकणार नाही. तो अद्वितीय आहे.  ज्याचं वर्णन करण्यासाठी वेदशास्त्र, पुराणं पण कमी पडली. त्याचं वर्णन करणं अशक्य आहे.  त्याला आपण शरण जावं. त्याच्या चरणाशी स्थान बघावं.  त्याला अनन्यं भावाने शरण जावं ह्यातच आपली उन्नती आहे.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.