Manobodh by Priya Shende Part 75 – समस्तामध्ये सार विचार आहे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 75 (Manobodh by Priya Shende Part 75)

समस्तांमध्ये सार विचार आहे

कळेना तरी सर्व शोधून पाहे

जीवा संशयो वाउगा तो तजावा

प्रभाते मनी राम चिंतीत जावा

या श्लोकांमध्ये समर्थ सांगत (Manobodh by Priya Shende Part 75)आहेत की मनात व्यर्थ संशय घेऊन काही उपयोग नाही. सर्व साधनांमध्ये सहज सोपे आणि श्रेष्ठ साधन म्हणजे नामस्मरण हेच आहे.

आपण याआधीही बर्‍याच साधना पाहिले आहेत तपःसाधना, योगसाधना, व्रतवैकल्य, दानधर्म, उपासना, पारायण.  या सर्व साधना करण्यात खूप अडचणी आहेत.  काही साधना शरीरासाठी अवघड आहेत, तर काही आर्थिक दृष्टीने अडचणीच्या आहेत.  तपःसाधनेला देहदंड द्यावा लागतो.  तो सगळ्यांना सोसणारा नसतो.  व्रतवैकल्य, दानधर्म हे खर्चिक आहे.  त्यासाठी धन असावं लागतं.  यज्ञयागासाठीही धनाची आवश्यकता असते.  पण फक्त रामनाम असा आहे, ज्याला धनाची आवश्यकता नाही आणि शारीरिक कष्टही नाही.  हेच समर्थ आपल्याला सतत सांगत आहेत.

“समस्त मध्ये सार विचार आहे”, सगळ्या मध्ये चांगला विचार,  सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण हाच आहे.  माणसाला सांगून पटत नाही.  त्याच्या मनात नाना शंका डोकावत असतात.  म्हणून समर्थ म्हणताहेत की, “कळेना तरी सर्व शोधून पाहे”.  माणसाला सांगून कळत नसेल, पटत नसेल तर त्यांचं त्यांनीच शोधावं आणि याचा पडताळा घ्यावा आणि खात्री करून घ्यावी.  कारण शेवटी अनुभवानेच माणूस शहाणा होतो.  एखादी गोष्ट करू नये, असं म्हटलं की तीच गोष्ट हमखास करणार, ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे.  त्या प्रवृत्तीला अनुसरूनच समर्थ सांगताहेत की, बाबारे तुझी तूच खात्री करून घे.

त्यासाठी ग्रंथ, पुराणं, उपनिषदं, चरित्रं या सगळ्याचा अभ्यास कर आणि त्यातलं सार तुझं तूच समजावून घे.  एखाद्या मुलाला त्याचे पालक सतत बजावत असतात की, आगी जवळ जाऊ नको, तरी तो जातो आणि शेवटी चटक्याचा अनुभव घेतो, तेव्हाच शांत बसतो.  तसंच न ऐकणाऱ्यांना समर्थ सांगताहेत की तू , स्वतः अभ्यास कर आणि अनुभव घे आणि तेव्हा तुला कळेल की इतर मार्गापेक्षा रामनामाचा मार्ग किती सोपा आहे.

Talegaon News: धनंजय उर्फ मंदार कटककर यांचे निधन

“जीवा संशयो वाउगा तो तजावा” तू मनात शंका आणू नकोस.  संशयाने मन अस्थिर होतं आणि योग्य विचार करू शकत नाही. नुकसान आपलं होतं.  तर तू निरर्थक संशय मनातून काढून टाक, आणि तुला पटत नसेल तर तुझी तू खात्री करून घे, तेव्हा तुला कळेल की रामनामाचा मार्ग हा सर्व इतर मार्गांपेक्षा साधा सोपा आहे.

म्हणूनच समर्थ म्हणत आहे की (Manobodh by Priya Shende Part 75) अगदी सकाळी उठल्यापासून रामनाम म्हणायला लागा. रामनामाचा जप करा.  म्हणजे दिवसभर आपल्या मनात,चित्तांत राम वसेल आणि आपली प्रगती होईल.  मुक्तीकडे वाटचाल होईल.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे
मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.