Manobodh by Priya Shende Part 9 : मनोबोध भाग 9 – नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक नऊ.

नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे

अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे

न होता मनासारिखे दुःख मोठे

प्रत्येक माणसाला पैसा, धन याची आवश्यकता असते. प्रत्येकाला वाटत असतं की, आपल्याकडे खूप पैसा, संपत्ती असावी म्हणजे, आपण सुखी राहू. पण खरं तर, सर्व सुख, संपत्ती मध्ये नसतंच. त्यातून माणसाला आयता, न कष्टं करता, पैसा मिळाला तर, आनंदच असतो. ही तर अजून चुकीची गोष्ट आहे. त्यासाठी समर्थ सांगताहेत की, बाबारे तू कष्टं कर. पैसा मिळव आणि त्याचा आनंद घे.

समर्थांनी भक्तियोग सांगितलाच आहे, पण त्या सोबत त्यांनी कर्मयोग किती महत्त्वाचा आहे, हे देखील सांगितला आहे.

पहिल्या चरणात ते सांगत आहेत कि, बाबारे पुढीलांचे द्रव्य तू डोक्यात घेऊ नकोस. तू स्वतः कमव. चांगलं कर्म कर.

आता इथे पुढीलांचे म्हणजे काय तर, जे कोणी काळाच्या ओघात पुढे गेलेत, म्हणजेच आपले पूर्वज. तर त्यांनी दिलेल्या संपत्तीची तू हाव धरू नकोस, ती त्यांनी कमवून साठवलेली आहे. तिचा संचय आहे आणि हा संचय केव्हाही संपू शकतो, तर तू कर्म करून संपत्ती तुझी तू जमव.

याचा अजून एक अर्थ असा असू शकतो की, आपल्या सोबतचे जर पुढे गेले, त्याची प्रगती झाली असेल तर, त्याची तू ईर्ष्या बाळगू नकोस.

त्याने जसे द्रव्य म्हणजेच पैसा कमावला, तसाच मला पण मिळायला पाहिजे, ही ईर्ष्या मनातून काढून टाकायला पाहिजे, कारण त्याच्या कर्माप्रमाणे त्याला मिळणार आणि आपल्या कर्मा प्रमाणे आपल्याला. शेवटी देणारा वेगळाच आहे. आपण फक्त कर्म करायचा आहे.

किंवा समोर कोणीही असो, त्याला गोडीगुलाबीने किंवा दटावून त्याच्या संपत्तीवर हक्क दाखवू नये. आपण फक्त आपलं कर्म बघायचं.

माणसाला वाईट सवय असते की, मी इतकं काम करून, मला कमी पैसा मिळतो आणि माझ्याबरोबरच्याला माझ्यापेक्षा जास्त धन, सुविधा मिळतात. अशा विचारांनी माणसं व्यथित होतात, निराश होतात आणि दुसऱ्या व्यक्तीवर खार खात राहतात.

आपण अजून वेगळे किंवा प्रगत शिकून, आपलं पूर्ण योगदान देऊन, अजून योग्य ते परिश्रम करून, पुढे जावं हा विचार न करता, दुसऱ्याची प्रगती पाहून त्रास करून घेतात.

अशा विचारांनी कधीच उत्कर्ष होत नाही, प्रगती होत नाही, म्हणूनच समर्थ सांगताहेत की, तू सत्कर्म कर आणि जे मिळेल त्यात, समाधानी रहा. दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवू नकोस.

दुसऱ्या चरणात समर्थ म्हणताहेत की, !”अति स्वार्थबुद्धी नुरे पाप साचे”. म्हणजेच अति स्वार्थ माणसाला पाप आचरणातसाठी प्रवृत्त करतो. माझ्याकडे इतकं धन आहे, मला अजून हवे असे, एकदा व्यक्तीने ठरवलं की, मग येनकेन प्रकारे तो धनप्राप्तं करतो. त्याचा लोभ वाढत जातो, म्हणून समर्थ इशारा करत आहेत की, अति स्वार्थ बुद्धीने फक्त पाप संचय होतो. धन नाही.

पुढे समर्थ म्हणताहेत की, “घडे भोगणे पाप ते कर्म खोटे”. ज्या कर्मामुळे वाईट फळं मिळणार आहेत, ते कर्म खोटं आहे, ती कृती खोटी आहे, असं समर्थ सांगताहेत. म्हणूनच आपली वाटचाल ही दुष्कर्माकडून सत्कर्माकडे झाली पाहिजेत दुष्कृत्याकडून सत्कृत्याकडे झाली पाहिजे.

स्वार्थी आणि पापबुद्धी असलेला मनुष्य, हा समाजासाठी घातक ठरू शकतो अशा माणसांच्या मनात रजोगुण वास करू लागतात आणि मग दुसऱ्यांचं सगळं जावं आणि माझं चांगलं व्हावं, असं वाटत जातं.. तो हा रजोगुण.

त्यामुळे माणसाची रजोगुणाकडून सत्त्वगुणाकडे वाटचाल व्हायला हवी, ज्या कर्माने पाप वाढतं, दुःख वाट्याला येत, ते कर्म सोडून दिले पाहिजे, कारण ते खोटे आहे.

माणूस नको ती आशा म्हणजे मोह, आसक्ती मनात बाळगतो आणि मग मनासारखं झालं नाही की त्याचं दुःख करत बसतो.

त्यामुळे मनात चांगली आशा बाळगून, सन्मार्गाने त्याची पूर्तता करावी, प्रत्येक कृतीला “भगवंताने दिलेलं काम आहे”, असं समजून ते काम केलं तर नक्कीच आपलं कृत्य ही सत्कृत्य होतील आणि मग दुःखी होण्याचा प्रश्नच येणार नाही. प्रत्येकाला वाटतं की, मला मी केलेल्या कर्माचे फळ मिळावं, पण मनुष्याला कर्माचा अधिकार आहे. फळ देण्याचा अधिकार भगवंताकडे आहे. जे देईल ते, जेव्हा येईल तेव्हा स्वीकारणं, हाच खरा धर्म आहे.

गीतेत पण भगवंताने हेच सांगितला आहे … “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”. अपेक्षा नसली की अपेक्षाभंगाचे दुःख ही होणार नाही.

एक उत्तम जीवनाचं सूत्रच समर्थांनी दिला आहे की, दुःखी व्हायचं नसेल, सुखात राहायचं असेल तर, दुसऱ्यांच्या संपत्तीवर आपली नजर ठेवू नका. त्यांना त्यांची प्रगती करू द्या आणि आपण आपली प्रगती करूयात.

वडिलोपार्जित संपत्ती हीच आपली म्हणून राहू नका. त्यासाठी सन्मार्गाने कर्म करत वाटचाल करा आणि चांगली आशा ठेवून तुमचं सत्कर्म करत रहा.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.