Maval News : वडेश्वर शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या इमारतीसाठी 10 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – आंदर मावळातील वडेश्वर येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील शालेय इमारतीच्या बांधकामासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत 10 कोटी 75 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या आश्रम शाळेच्या सुधारणेसाठी आमदार सुनिल शेळके मागील दोन वर्षांपासून सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.

वडेश्वर येथे 1974 साली शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा बांधण्यात आली होती.या शाळेत साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी सध्या शिक्षण घेत असून त्यातील 300 विद्यार्थी वसतिगृहात निवासी आहे. या शाळेच्या बांधकामास 47 वर्षे पूर्ण होत असून या शाळेची व वसतिगृहाची इमारत मोडकळीस आली आहे. त्यात मागील दोन वर्षांपासून मावळात आलेल्या निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीमुळे शाळा व वसतिगृहाची इमारतीचे नुकसान झाले होते.

या शाळेतील मुलांना धोकादायक इमारतीमध्ये जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ येऊ नये.तसेच त्याठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शाळेची व वसतिगृहाची नवीन सुसज्ज इमारत उभारण्यात यावी यासाठी आमदार सुनिल शेळके मागील दोन वर्षांपासून शासनाकडे सातत्त्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याने मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी साठी 10 कोटी 75 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

आमदार सुनिल शेळके म्हणाले, ‘आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविकासआघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. वडेश्वर येथील शालेय इमारतीची दुरावस्था झाली आहे. मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणुन चांगले शिक्षण मिळावे. आवश्यक सोयीसुविधा मिळाव्यात. यासाठी सर्व सोयीसुविधांसह सुसज्ज अशी शालेय इमारत उभारण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी या शाळांमध्ये बदल होणे आवश्यक आहे. यासाठी महाविकासआघाडी सरकारने पावले उचलत निधी उपलब्ध करून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.