Maval News : थंडीने गारठून 32 मेंढ्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – वातावरण बदलामुळे मावळात अवकाळी पाऊस व कडाक्याची थंडी पडली आहे. यामुळे पिंपळोली गावात मेंढपाळांच्या 32 मेंढ्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. तसेच 15 मेंढ्या आजारी पडल्या आहेत. ही दुर्घटना गुरुवारी (दि. 2) घडली आहे.

रमेश पावसु करे व भीमा नारायण करे या मेंढपाळांच्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. मावळ तालुक्यात मुबलक चारा उपलब्ध होत असल्याने अहमदनगर, जेजुरी, बारामती, पुरंदर, इंदापूर आदी भागातून गेल्या अनेक वर्षांपासून मेंढपाळ यांचे कळप मावळ तालुक्यात दसरा झाल्यावर दाखल होतात.

बुधवार (दि.1) पासून वातावरण बदलामुळे पाऊस व कडाक्याची थंडी पडल्याने उघड्यावर असलेल्या मेंढपाळांचे संसारोपयोगी साहित्य भिजले असुन पावसाने व थंडीने 32 मेंढ्यांचा मृत्यू तर 15 मेंढ्या आजारी पडल्या.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी थंडीने आजारी पडलेल्या मेंढ्यांना शेकोटी करून दिली. मेंढपाळ कुटुंबाला मदत केली.

मावळचे निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे म्हणाले मेंढपाळ यांचे खूपच मोठे नुकसान झाले असुन शासनाच्या वतीने प्रत्येकी एका मेंढीला 3000 रुपये असे मृत 32 मेंढ्यांची नुकसान भरपाई 48 तासात देण्यात येईल.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश भोसले म्हणाले वातावरण बदलाने पाऊस व कडाक्याच्या थंडीने गारठून मेंढ्यांचा मृत्यू झाला. 15 मेंढ्या आजारी आहेत. शासनाकडून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अहवाल पाठविला आहे.

यावेळी मंडलाधिकारी माणिक साबळे, तलाठी उदय कांबळे, सरपंच नीलम सुतार, पोलीस पाटील दीपाली बोंबले, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा गायकवाड, सोपान पिंपळे, सुनील गुजर व ग्रामस्थ उपस्थित होते.

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यात कडाक्याची थंडी पडली असून आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.