Pimpri News: दररोज पाणी पुरवठा करण्यात सत्ताधारी फेल; शहरवासीय सत्ताधाऱ्यांना पाणी पाजतील – विलास लांडे

एमपीसी न्यूज – सत्तेत आल्यावर आम्ही दररोज पाणी पुरवठा करू, अशा बढाया भाजपने मारल्या; मात्र प्रत्यक्ष सत्तेत आल्यावर पाणी पुरवठ्याबाबत त्यांचे ढिसाळ नियोजन सुरू झाले आहे. अद्यापही नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. सत्ताधारी केवळ दिखावा करण्यात आणि बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सुचना करण्यात व्यस्त आहेत. पाणी पुरवठ्याची दिलेली कमिटमेंट फेल गेली असल्याचे वास्तविक चित्र आहे. दररोज पाणी पुरवठा त्वरित सुरू करावा. अन्यथा शहरवासीय तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी आमदार विलास लांडे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता अद्यापही नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना रोज पाणी पुरवठा करू, अशा बढाया मारल्या होत्या. वास्तविक सत्तेत आल्यानंतर त्यांना या अश्वासनाचा विसर पडला असल्याचे दिसते. आंद्रा, भामा व आसखेडच्या पाण्याचे तर गाजर दाखविले जात आहे. अद्याप हा प्रकल्प मार्गी लावला नाही. हे प्रकल्प मार्गी लावण्याची धमक सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी आयुक्त राजेश पाटील यांना अनेक वेळा निवेदने दिली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी नोव्हेंबर 2021 अखेर पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा शब्द दिला. परंतु, तो शब्द पाळला गेला नाही. पाण्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना वेठीस धरले आहे, असा आरोप लांडे यांनी केला आहे.

विशेषतः मोशी, चऱ्होली, वडमुखवाडी, डुडुळगाव, चिखली, जाधववाडी या पट्ट्यात मोठं मोठे गृह प्रकल्प विकसित झाले आहेत. तेथील लाखो लोकांना गेल्या चार वर्षांपासून पाणी विकत घ्यावे लागत आहे. मग पवना धरणातून उचलले जाणारे 490 एमएलडी पाणी फक्त अर्ध्या शहराला सोडले जाते का ? आणि अर्धे शहर टँकर माफियांद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पोसले आहे का ? असा संतप्त सवाल माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.