Maval : मावळात आमदारकीसाठी भाजपकडून ‘ऐनवेळी’ तब्बल 14 जण इच्छुक!

एमपीसी न्यूज – भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ विधानसभा मतदारसंघात मुलाखतीच्या दिवशी ऐनवेळी इच्छुकांची संख्या तब्बल 14 वर जाऊन पोहचल्यामुळे राजकीय वर्तुळात तो जोरदार चर्चेचा विषय झाला आहे. इच्छुकांची ही संख्या समर्थनासाठी फुगविण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे इच्छुकांपैकी कोण कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार याबाबत तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.

भाजपचे पक्ष निरीक्षक व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दुपारी मावळातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व सरचिटणीस सचिन सदावर्ते उपस्थित होते.

विद्यमान आमदार व राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पक्षाकडे तिसऱ्यांदा संधी देण्याची मागणी केली आहे. भेगडे यांच्या बरोबरच तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके व भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे या दोन प्रबळ दावेदारांनीही आज उमेदवारीसाठी मुलाखत दिली.

या तिघांव्यतिरिक्त भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले तसेच ज्येष्ठ नेते शंकरराव शेलार, भास्करराव म्हाळसकर, सुकन बाफना, तळेगाव नगरपरिषदेचे पक्षप्रतोद सुशील सैंदाणे यांच्या बरोबर युवानेते जितेद्र बोत्रे, नितीन मराठे, विशाल खंडेलवाल यांनीही उमेदवारीच्या आखाड्यात दंड थोपटले आहेत.

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मुलाखती पार पडल्या असल्या तरी ऐनवेळी वाढलेल्या इच्छुकांच्या संख्येमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. आपल्या उमेदवारीची खुंटी बळकट करण्यासाठी मुद्दाम आपल्या समर्थकांना इच्छुक म्हणून रिंगणात उतरविण्याचे राजकारण प्रमुख दावेदारांनी केले असल्याचे बोलले जात आहे.

या 14 इच्छुकांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार असल्याने जास्तीत जास्त इच्छुकांनी आपल्याला पाठिंबा देऊन निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी, अशी राजकीय खेळी त्यामागे असल्याची चर्चा रंगली आहे. एकदंरित इच्छुकांच्या मुलाखतींच्या निमित्ताने भाजपमधील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.