Maval : महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत – आमदार लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – लोकसभेची निवडणूक हा देशाचा सर्वात मोठा उत्सव आहे. महायुतीच्या माध्यमातून पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी हे उमेदवार आहेत. देशभरातील महायुतीच्या उमेदवाराला पडणारे प्रत्येक मत नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविण्यासाठी उपयोगी ठरणारे आहे. असे मत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, नगरसेवक शत्रुघ्न काटे, निर्मल कुटे, शीतल शिंदे, उमा खापरे, अमोल थोरात, संजय कुटे, संकेत कुटे, अनिल तुतारे, जयनाथ काटे, शरद कोकणे, महेश कुलकर्णी, जयश्री गावडे, माऊली थोरात, मारुती जकाते आदी उपस्थित होते.

बारणे यांनी पिंपळे सौदागर येथील कुणाल रोझ आयकॉन सोसायटीत बैठक घेतली. आंबा महोत्सवास भेट दिली. कोकणे चौक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास हजेरी लावली. त्यानंतर काही सोसायट्यांमध्ये बैठका आणि भेटी घेत चिंचवड येथे कोपरा सभेला बारणे यांनी मार्गदर्शन केले.

लक्ष्मण जगताप म्हणाले, “ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. देशाला विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार यायला हवे. सर्व स्तरावर देशभरात विकासकामे होत आहेत. पवना धरणातील गाळ काढल्याने पिंपरी चिंचवड शहराला सुमारे दीड महिना अधिक पुरेल एवढा पाणीसाठा वाढला आहे. पिंपळे सौदागर आणि परिसरात अनेक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी सर्वजणांनी कंबर कसली आहे. लवकरच सर्व समस्या सुटतील. शहर आणि देशाच्या विकासाचा आलेख वाढविण्यासाठी मोदींची आवश्यकता आहे. आपल्या मतदारसंघाच्या खासदाराला सलग पाच वर्ष संसदरत्न पुरस्कार मिळणे ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवण्यासाठी, पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वाधिक मताधिक्य मिळवून द्यावं.”

श्रीरंग बारणे म्हणाले, “शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. मेट्रो आली. केंद्र सरकारच्या अनेक योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्या. देशांतर्गत कामासह आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील नरेंद्र मोदी सरकारने उत्तम कामगिरी केली आहे. विरोधक मोदींना टार्गेट करत आहेत. पण त्याचा जनतेवर काहीही फरक पडणार नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने चुकीच्या पद्धतीने कामे केली. त्यामुळे इथल्या जनतेने त्यांना हद्दपार केले आहे. त्यामुळे इथली जनता महायुतीला पसंती देत आहे. चांगल्या उमेदवाराला पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी महायुतीला मतदान करावे, असे आवाहन केले.

खासदार अमर साबळे म्हणाले, “भडकाऊ आणि विषारी प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना भाजप सरकार बदलणार असल्याचे बोलले जात आहे. पण तसे काही नसून लोकशाहीला बळकटी आणण्यासाठी भाजप सदैव कटिबद्ध आहे. लोकशाही माध्यमातून देशाचा विकास करायचा आहे. भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त देश करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न सुरू आहे. आजवरच्या सरकारला अशक्य वाटणारी कामे मोदींनी अभ्यासपूर्ण कौशल्याने सहज केली आहेत. त्यांच्या साथीला श्रीरंग बारणे यांच्यासारखे खासदार असल्याने संसदीय कामकाजाला विशिष्ट धार येत आहे. बिभीषणामुळे रामाला रावणावर विजय मिळवता आला. मी बारामतीच्या लंकेतला बिभीषण भारतीय जनता पक्षात आहे. माझे मूळ गाव बारामती आहे. त्यामुळे आता महायुतीचा विजय अटळ आहे” असेही साबळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.