Maval News : प्रा. महादेव वाघमारे उर्फ ज्युनिअर मकरंद अनासपुरे यांचा मावळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून विशेष सत्कार 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 4 कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन कोरोना रुग्णांच्या मनावरील ताणतणाव कमी करणारे प्रा. महादेव वाघमारे उर्फ ज्युनिअर मकरंद अनासपुरे यांचा मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी बुधवारी (दि.7) त्यांच्या कार्यालयात विशेष सत्कार केला.

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पाश्चात तंत्रज्ञान संस्था कोविड केअर सेंटर, टाकवे खुर्द येथील समुद्रा कोविड केअर सेंटर, इंदोरी येथील तोलानी कोविड केअर सेंटर व लोणावळा कोविड केअर सेंटरमध्ये दर दहा दिवसाला सातत्याने कोरोना रुग्णांच्या मनावर कोरोना आजाराचा ताण असताना, त्यांना खास मकरंद अनासपुरे शैलीत विविध विनोद, मराठी चित्रपटातील प्रसंग तसेच मानसशास्त्रीय उदाहरणे देऊन रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम करत आहेत.

मावळ तालुक्यात ज्यावेळेस कोरोना रुग्णाच्या संपर्कात कोणी जात नव्हते तेव्हापासून हा हास्य कलाकार सातत्याने कोरोनाच्या रुग्णांना धीर देण्याचे काम करत असल्याने मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी प्रा. महादेव वाघमारे यांच्या कार्याची दखल घेऊन खरा कोरोना योद्धा म्हणून विशेष सत्कार केला.

याप्रसंगी प्रा. महादेव वाघमारे म्हणाले मानवाच्या शरीराला आजार नसतो तो मनात आजार निर्माण होतो. आजारात केवळ आधाराची गरज असते. त्याच्या मनावर आलेला ताण हा हास्य विनोदातूनच कमी होतो. तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी हास्य टॉनिक अत्यावश्यक आहे. कोविड केअर सेंटरमध्ये जाण्याची प्रेरणा मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडून मिळाली असून आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरमध्ये हास्य विनोदाचा कार्यक्रम सादर करताना आणखी आत्मविश्वास मिळाला.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी माझा सत्कार करुन मला आणखी काम करण्याची ऊर्जा दिली. याप्रसंगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.