Meaning of National Pledge : अर्थ प्रतिज्ञेचा (भाग 7) – माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.   

एमपीसी न्यूज (प्रा. श्रीपाद भिडे) – मित्रांनो आपण आपल्या क्रमिक प्रतिज्ञेचा गर्भितार्थ पाहत शेवटपर्यंत पोहोचलो आहोत. ज्या मातृभूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीत जन्मलेल्या भूमीपुत्रांशी, आपल्या बांधवांशी  आपले  ऋणानुबंध कसे असावयास हवेत, ह्या बद्दलची हि प्रतिज्ञा. वरील ओळीत आपण आपल्या बांधवांशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा करत आहोत.  

निष्ठा म्हणजे नक्की काय? निष्ठा ही एखाद्या प्रकारचीच असते असे नाही तर आपण कोणावरही आणि कोणतीही निष्ठा बाळगू शकतो. उदा. वेळेची निष्ठा, गुरुनिष्ठा, व्रतनिष्ठा, धर्मनिष्ठा वगैरे. एखाद्या व्रताचा अंगीकार करणे नुसता अंगीकार नाही तर ते व्रत अगदी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा प्राण पणाला लावून पाळणे म्हणजेच निष्ठा. असे व्रत अथवा नियम निष्ठेमध्ये परवर्तीत होतो. आणि अशीच  दृढ निष्ठा आपल्या बांधवांवर ठेवण्याची आपण इथे प्रतिज्ञा करत आहोत. नुसती प्रतिज्ञा नाही तर तशी ग्वाही द्यायची आहे. 

Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क – स्मिता करंदीकर

मग आता देशबान्धवांशी, देशाशी निष्ठा म्हणजे नेमके काय ? मित्रांनो ज्या मातृभूमीत आपण जन्मलो , लहानाचे मोठे झालो, नुसतेच मोठे नाही तर तिथल्या संस्कृतीने आपण संस्कारित झालो, सर्वांगीण घडलो, ज्ञानी बनलो, त्या भूमीशी आपण तन मन व धनाने एकनिष्ठ राहायला हवे. मित्रांनो, आपला देश हा विविध परंपरांनी नटलेला आहे. बऱ्याच पंथांची माणसे इथे वास्तव्यास आहेत. हे आपण आधीच्या काही भागात पाहिले.

एकाच आईची सर्व संताने म्हणजेच आपले बांधव ह्या नात्याने त्यांचे राहणीमान, परंपरा , श्रद्धास्थाने ह्या प्रत्येकाबाबतीत आपली निष्ठा असणे गरजेचे आहे. एक राष्ट्र म्हणून आपली एकी  दिसायला हवी आणि प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीमध्ये अथवा कोणत्याही देशकार्यात आपण एकत्रितपणे खांद्याला खांदा लावून सामील व्हायला हवे.

तुज साठी मरण ते जनन   तुझवीण  जनन ते मरण || 

ह्या स्वातंत्र्यदेवीच्या स्तुतीमध्ये भारतरत्न सावरकर म्हणतात ,”हे भारतमाते तुझ्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर. कारण तुझ्यासाठी मरणं हेच आमचं जगणं आणि तुझ्याशिवाय जगणं हे मरणासमान आहे. आपली मातृभूमी भारतमाता हिच्यासाठीच आपलं सारं जीवन व्यतीत करणे हेच खरं जगणं.” आणि ह्या त्यांच्या वचनाप्रमाणे सावरकरआयुष्यभर स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच झटले. भारतमातेचं स्वातंत्र्य हेच त्यांच्या जीवनाचं जणू ध्येय होतं, तशी त्यांनी शपथही घेतली होती. आणि म्हणूनच ते स्वातंत्र्यवीर म्हणून ओळखले जातात.

Watch on Youtube: ऐका… आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

जे जे स्वातंत्र्यलढ्यात सामील होते त्या प्रत्येकाचीच मातृभूमीपोटी असीम निष्ठा होती असे म्ह्टले तर नक्कीच वावगे ठरणार नाही. इंग्रजांसारखा प्रबळ शत्रू पुढे असताना देखील हे वीर तसूभरही आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या व्रतापासून ढळले नाहीत हीच ती निष्ठा. लाला लजपतराय, शिरीषकुमार,  बाबू गेनू ह्या सारखे स्वातंत्र्यसेनानी तर इंग्रजांच्या गोळीने सहजपणे शहीद झाले पण मातृभूमीप्रती आपली निष्ठा ढळू दिली नाही.

“ देहाकडून  देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि मी त्याचे काही देणे लागतो.” 

स्वातंत्र्यवीरांचेच हे वचन सतत ध्यानात ठेवायला हवे. आता आपल्याला कोणत्याही परकीय शक्तींशी सामना करावयाचा नाही किंवा लढावयाचेही नाहीये. आपण स्वतंत्र म्हणून जे विनासायास मिरवतो आहोत तेच स्वातंत्र्य आपल्याला अपार निष्ठेने जपायचे आहे आणि हाच अर्थ आहे “मी त्याचे काही देणे लागतो” ह्याचा.

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

परकीय शक्तींविरुद्ध जरी लढा नसला तरी समाजातील अनिष्ठ रुढी परंपरा असो अथवा देशात राहून विघातक कार्य करणारे किंवा जातीय राजकारण करून बांधवांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आपल्याच स्वकियांविरोधात मात्र हा लढा निश्चितच राहणार आहे. देशाचा गौरव हा माझा गौरव आणि देशाचा अपमान तो माझा अपमान अशी भावना सतत असायला हवी. आपल्या उच्च शिक्षणाचा आपल्या देशालाच कसा फायदा होईल ह्याचा सतत विचार व्हायला हवा. आणि तसे झाले नाही तर जमा केलेली विद्या हि विद्या न राहता तो विद्येचा व्यर्थ भार होई

गुणसुमनें मी वेचियली या भावें  की तिने सुगंधा घ्यावें || 

जरि उद्धरणी व्यय  तिच्या हो साचा  हा व्यर्थ भार विद्येचा  || 

आपल्या प्रत्येक आचारातून विचारातून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे देशसेवाच घडली पाहिजे. आपले वर्तन हे आपल्या कोणत्याही देशबांधवाला दुखवणारे नसायला हवे. मग ते कोणाचे वैयक्तिक नुकसान असो वा सार्वजनिक, कोणत्याही असामाजिक परिस्थितीला आपण कारणीभूत होता कामा नये. देशावर येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करावयास आपण सदैव अग्रेसर असायला हवे. देशावर येणारे संकट हे माझेच संकट वाटायला हवे. अशा वेळेस आपल्या देशबांधवांच्या पाठीशी आपण उभे राहणे गरजेचे आहे.

“ शिवाजी जन्माला यावा, पण शेजारच्या घरात ”

हा विचार तारणारा नसून तो सर्वस्वी घातक आहे. कारण संकट आपल्या दारापर्यंत आल्याशिवाय त्याच्याबद्दल गांभीर्य नसणे हि खूप खेदाची बाब आहे. जिजाऊ बाईसाहेबांनी असाच विचार केला असता तर पहिला हिंदूपतपातशहा हा जन्मालाच आला नसता. आणि आपले हि अस्तित्व आज हिंदू म्हणून नसले असते.

Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण 

मित्रांनो संतविचारांनी आणि त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र अशी आपली भूमी. ज्या संतांनी आयुष्यभर समानतेची शिकवण, धर्मजागरण आणि सत्याच्या मार्गाचा अवलंब केला त्या संत विचारांशी निष्ठा राखणे गरजेचे आहे. जेव्हा ह्या विचारांशी निष्ठा राखली जाईल तेव्हा आपोआपच आपल्या संविधानाचा आदर राखला जाईल आणि पर्यायाने देशाशी आणि देशबांधवांशी निष्ठा राखली जाईल. (क्रमश:) 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.