Pune News : तीन महिन्यांपासून बंद लकडी पुलावरील मेट्रोचे काम पोलीस बंदोबस्तात पूर्ण

एमपीसी न्यूज – मागील तीन महिन्यांपासून पुणे शहरातील लकडी पुलावरील मेट्रोचे काम बंद आहे. विसर्जन मिरवणुकीत देखाव्यांना अडथळा ठरणार असल्याचे कारण देऊन गणेश मंडळांनी या पुलाला विरोध केल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून हे काम ठप्प होते. त्यानंतर आता प्रथमच पुण्यातील मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी याप्रकरणी आपली भूमिका जाहीर केली. दरम्यान, मेट्रोच्या कामाला आमचा कधीच विरोध नव्हता असे त्यांनी जाहीर केले त्यानंतर संभाजी पुलावरील बहुचर्चित मेट्रोचे काम पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये गुरवारी रात्री 11 च्या सुमारास मेट्रो प्रशासनाने हाती घेतले. हे काम शुक्रवारी सकाळपर्यंत पूर्ण करण्यात आले.

संभाजी पुलावरील मेट्रोच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस अडथळा निर्माण होईल म्हणून काम बंद करण्याचे निवेदन गणेश मंडळांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिले होते. यावर मेट्रो प्रशासनाने मागील चार महिने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तज्ञ समितीने सुचविलेले पर्याय अव्यवहार्य असल्याने महापौरांनी काम सुरू करण्यास सांगितले असे या निवेदनात म्हटले आहे.

त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ, मंडळांचे प्रतिनिधी, विरोधी पक्षांचे नगरसेवक, मेट्रो, वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र योग्य पर्याय समोर येऊ शकला नाही. त्यामुळे महापौरांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना हट्ट सोडण्याची विनंती केली होती. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून काम सुरू करण्याच्या सुचना मेट्रो प्रशासनाला केल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुंबईत बैठक घेऊन पोलिस बंदोबस्तामध्ये काम करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर मेट्रो प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त घेवून गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास थांबलेले काम पुन्हा हाती घेतले. तब्बल 48 टन वजन आणि 50 मीटर लांबी असलेले तीन मीटर उंचीचे स्टीलचे दोन गर्डर पहाटेपर्यंत दोन क्रेनच्या सहाय्याने बसविले जाणार असल्याचे मेट्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले. यासाठी एक्सपर्ट टिम, लिफ्टींग ऑफरेशन टिम, उभारणी टिम असे एकूण शंभर कर्मचारी कार्यरत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.