Pimpri News : विशिष्ट कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून निविदेत अटी-शर्थी, चौकशी करा; आमदार बनसोडे यांची मागणी

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सामाविष्ट रुग्ण व इतर रुग्णांकरिता शस्त्रक्रिया किंवा इतर उपचाराकरिता लागणारे इम्प्लांट साहित्य खरेदी करण्याची निविदा विशिष्ट कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून काढली आहे. अटी-शर्थी तशा टाकल्या आहेत. याची सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केली. सखोल चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत सदर निविदा स्थगित करणे आवश्यक आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले. त्यात आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे की, निविदेतील वैद्यकीय साहित्याची 6 कोटी 98 लाख 63 हजार 750  रुपये इतकी अंदाजित रक्कम दर्शविण्यात आली आहे. निविदेतील क्रमांक 8 च्या शर्तीनुसार राज्यातील कोणतीही मोठी शासकीय/ निमशासकीय वैद्यकीय संस्था अशा विशिष्ट अटी-शर्थी टाकून खरेदी खत करताना दिसून येत नाही. याचा अर्थ विशिष्ट ठेकेदारांना किंवा पुरवठादारांना डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचा अटी-शर्थी तयार करण्याचा घाट महापालिका भांडार विभागांनी केलेला दिसून येतो.

6 कोटी 98 लाख 63 हजार 750 रुपये खर्चाच्या निविदा रकमेमधील अट क्रमांक 8 मध्ये बदल केल्यास ही निविदा 2 कोटी रुपयांवर येईल. महापालिकेची सुमारे 4  कोटी रुपयांची बचत होईल म्हणून वस्तुस्थिती पडताळणी होणे आवश्यक आहे. याचबरोबर ज्या योजनेतील रुग्णांवर उपचारासाठी हे साहित्य वापरले जाणार आहे. त्या योजनेतील रुग्णाला राज्य शासनाकडून होणारा खर्च अदा करण्यात येत असतो. त्याच योजनेसाठी महापालिका पुन्हा कोटी रुपयांवर खर्च करून निविदा काढण्याचा नेमका हेतू काय ? ही ई-निविदा तात्काळ स्थगित करून निविदा अटी-शर्थी मधील घोळ नेमका का ? तो कोणी केला? याबाबत समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी आमदार बनसोडे केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.