Pimpri News : मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह पदाधिकारी अटकेत

एमपीसी न्यूज – जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावरून धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह पदाधिका-यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे, असं म्हटले आहे. देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद दाखवून द्या, असा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांनी बुधवारपासून भोंग्यांविरोधात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पत्र प्रसारित केले.

भोंग्यावरुन हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न मनसेच्या  कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यापार्श्वभूमी पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन तुकाराम चिखले यांना त्याच्या घरुन अटक करण्यात आली.

उपशहरअध्यक्ष विशाल शिवाजी मानकरी, विद्यार्थी सेनेचे भोसरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक शिंदे, रोहिदास शिवणेकर यांना निगडी पोलिसांकडून अटक केली आहे. दिघी पोलीस स्टेशन कडुन अंकुश तापकीर, मनविसे शहर अध्यक्ष हेमंत डांगे, चिंचवड विधान सभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, उपाध्यक्ष बाळा दानवले, उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरगे यांना चिंचवड पोलीस यांनी ताब्यात घेतले असल्याचे चिखले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.