Pimpri-Chinchwad Corona Update: युवकांना कोरोना होण्याचे प्रमाण सर्वाधिक

most coronavirus positive youth in pimpri-chinchwad

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे. विशेष म्हणजे या विषाणूने शहरातील युवकांना विळखा घातला आहे. शहरातील तब्बल 156 युवकांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांमध्ये आहे. त्याखालोखाल 40 वर्षापुढील 95, 13 वर्षांपुढील 56 तर 45 लहान मुलांना आणि 60 वर्षांपुढील 40 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असून आजपर्यंत 170 जण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत.

दि. 10 मार्च रोजी शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर 78 दिवसात शहरातील तब्बल 392 जणांना आजपर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 170 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय 215 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण युवकांमध्ये सर्वाधिक आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. झोपडपट्यांमध्येही कोरोना शिरला आहे.

शहाराला दि. 22 मार्च रोजी रेडझोनमधून वगळण्यात आले आहे. परंतु, रेडझोनमधून वगळल्यापासून शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. मागील तीन दिवसांपासून दिवसाला 40 नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. चिंचवड स्टेशन येथील एकट्या आनंदनगर झोपडपट्टीत दीडशेहून अधिक रुग्ण आहेत.

‘या’ वयोगटातील रुग्णांना कोरोनाची बाधा
शहरातील 22 ते 39 वय वर्ष असलेल्या 156 युवकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वय वर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 95 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वय वर्ष असलेल्या 56 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 0 ते 12 वय वर्ष असलेल्या 45 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 40 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

शहरात 215 सक्रिय रुग्ण!
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 215 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम, भोसरी रुग्णालयात तर काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 215 सक्रिय रुग्णांपैकी तब्बल 199 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. केवळ त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. पण, त्यांच्यात लक्षणे काहीच नाहीत. तर, शहरातील 8 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. 6 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.