Pune News : भाडेतत्त्वावर 500 बस घेण्याचा एसटीचा निर्णय रद्द न झाल्यास आंदोलन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने खासगी 500 गाड्या भाडेतत्त्वावर  घेतल्या तर त्यांना चांगले उत्पन्न असलेल्या मार्गांवर वाहतुकीस परवानगी दिली जाईल. त्यामुळे एसटीचा प्रवासी त्या गाड्यांतून प्रवास करेल. त्याचा परिणाम म्हणून एसटीचे प्रवासी कमी होऊन उत्पन्न घटेल. त्यामुळे एसटी महामंडळाने हा निर्णय रद्द करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला आहे.

या खासगी गाड्यांचे पार्किंग व मेंटेनन्ससाठी महामंडळाच्या मालकीच्या जागा देणे, तसेच जास्त उत्पन्न आणणारे महामंडळाचे मार्गही खासगी वाहतूकदारांना देण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरु आहेत़ ही अत्यंत गंभीर बाब आहे.

यापूर्वी भाडेततत्वावरील शिवशाही बसला जास्त उत्पन्नाचे मार्ग देण्यात आले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती आता केली जात आहे. ही बाब महामंडळास गंभीर बाधा आणणारी असून, खासगी वाहतुकीला प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे हा निर्णय महामंडळाने तत्काळ रद्द करावा, असेही निवदेनात म्हटले आहे.

‘एसटीचे मोठे आर्थिक नुकसान करणारा निर्णय’
भाडेतत्वावर 500 गाड्या घेणे हा निर्णय एसटीवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. मागणी मान्य होऊन खासगीकरणाचा निर्णय मागे घेतला गेला नाही तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– संदीप शिदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना, पुणे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.