Mp Shrirang Barne :  जैन धर्मियांच्या भावनांचा विचार करा; श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित करू नका

एमपीसी न्यूज : जैन धर्मियांचे श्री सम्मेद शिखरजी  हे तिर्थस्थळ झारखंड राज्यात आहे. या धार्मिक स्थळाला तेथील राज्य सरकारने पर्यटन स्थळ घोषित केले आहे.(Mp Shrirang Barne) या निर्णयामुळे पवित्र स्थळाची पवित्रता नष्ट होईल. या निर्णयाला भारतातील समस्त जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. याविरोधात उपोषण करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अहिंसा, शांततेचा संदेश देणाऱ्या जैन धर्मियांच्या भावनांचा विचार करून श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित करण्यात येवू नये. याबाबत झारखंड सरकारशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढावा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत बोलताना केली.

याबाबत केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनाही निवेदन दिले आहे. लोकसभेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, श्री सम्मेद शिखरजी हे झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. हे झारखंड राज्यातील सर्वात उंच पर्वत पारसनाथ टेकडीवर आहे. हे सर्वात महत्त्वाचे जैन तीर्थ (तीर्थक्षेत्र) आहे. जिथे चोवीस जैन तीर्थंकरांपैकी वीस जणांनी मोक्षप्राप्ती केली असे मानले जाते. त्यामुळे या क्षेत्राला  ‘सिद्धक्षेत्र’ असे म्हणतात.  जैन धर्मात या क्षेत्राला तीर्थराज अर्थात तीर्थाचा राजा मानतात. येथे 23 वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांनीही निर्वाण प्राप्त केले होते. 1,350 मीटर (4,430 फूट) उंचीवर असलेला हा पर्वत झारखंडमधील सर्वात उंच पर्वत आहे.

Pune News : रेडझोनबाबत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

श्री सम्मेद शिखरजी हे जैन धर्माच्या अनुयायांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. पारसनाथ पर्वत जगप्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी लाखो जैन भाविक येतात. पारसनाथ पर्वताची पूजा करतात. (Mp Shrirang Barne) अहिंसा आणि शांतताप्रिय जैन समाजाला झारखंड राज्यातील जैन समाजाचे पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या “श्री सम्मेद शिखरजी” हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यास या पवित्र स्थळाचे आणि जैन धर्माचे पावित्र्य नष्ट होईल, असे वाटते.

झारखंड सरकारच्या या निर्णयाला देश-विदेशातील जैन धर्मीयांकडून  सातत्याने विरोध होत आहे. याबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा बांधवांनी दिला आहे. त्यामुळे जैन धर्मियांच्या भावनांचा आदर करावा. या पवित्र भूमीला “श्री सम्मेद शिखरजी” पर्यटन स्थळ म्हणून घोषित करू नये. याबाबत  झारखंड सरकारशी आवश्यक चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी विनंती खासदार बारणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.