Railway News : चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व गाड्यांचा थांबा द्या; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर कोरोना काळानंतर रेल्वे गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या दोन स्थानकांवर गाड्यांना थांबा देण्याची मोठी आवश्यकता आहे. नागरिकांच्या सोईसाठी चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली.

याबाबत खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने नोकरीनिमित्त मुंबई, पुण्यात जातात. कोरोनानंतर चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर गाड्या थांबत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या दोन स्थानकांवर गाड्या थांबविण्याची विनंती बारणे यांनी केली. त्यावर पहिल्या टप्प्यात चार गाड्यांचा थांबा चालू केला जाईल. टप्प्या-टप्प्याने सर्व गाड्यांचा थांबा पूर्वीप्रमाणे चालू करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिल्याचे बारणे यांनी सांगितले.

खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोना कालावधीनंतर पूर्वीप्रमाणे रेल्वे गाड्या धावू लागल्या. आरक्षित तिकीटाबरोबरच ऐनवेळी तिकीट काढणा-यांनाही रेल्वे प्रवासाची मुभा दिली. एमएमआरडीए क्षेत्रामध्ये सीएसटीएम ते कसारा, कर्जत, खोपोली, सीएसटीएम ते पेन, रोहा, चर्चगेट, डहाणू या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन जाणा-या सर्व गाड्यांनी कर्जतवरील थांबा बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांना रेल्वेगाडी पकडण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातीलही रेल्वे थांबा बंद केला आहे. दादर-रत्नागिरी दरम्यान धावणा-या रेल्वे गाड्यांचाही थांबा बंद केला. अशाप्रकारे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना त्रास दिला जात आहे.

पूर्वी डेक्कन एक्सप्रेस चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर थांबत होती. आता त्याचा थांबा लोणावळा केला आहे. त्यामुळे कर्जत स्थानकावरील नागरिकांना रेल्वे पकडण्यासाठी कल्याण, बदलापूर स्थानकावर जावे लागत आहे. मध्य रेल्वे प्राधिकरणाने अनेक रेल्वेचा चिंचवड, कर्जत येथील थांबा बंद केला आहे. दुस-या पाळीत (शिफ्ट) काम करणा-या नागरिकांना बदलापूर, नेरळ, अंबरनाथ, खोपोली आणि कर्जत येथील नागरिकांना कोणार्क एक्सप्रेसचा उपयोग होतो. परंतु, कोणार्क एक्सप्रेस पुण्यात रात्री उशिरा येते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यापूर्वी कर्जत स्टेशनवर गाडी थांबत होती. पण, येथील थांबा बंद केल्याने नागरिकांना कल्याण स्टेशनवर जावे लागते. कल्याण आणि कर्जतकडे जाणारी पहिला रेल्वे पहाटे साडेपाच वाजता आहे. नागरिकांना पहाटे तीनपासून रेल्वेची वाट पहात बसावे लागते.

दक्षिण भारतातून येणा-या चेन्नई, कोणार्क, कन्याकुमारी, महालक्ष्मी, सिंहगड, अहिंसा, कोल्हापूर, सह्याद्री, डेक्कन एक्सप्रेस अशा 18 रेल्वे गाड्यांनी कर्जत, चिंचवड स्थानकावरील थांबा बंद केला आहे. 1 डिसेंबरपासून सुरु झालेल्या इंटरसिटी एक्सप्रेसचाही कर्जत येथील थांबा बंद आहे. पूर्वी इंटरसिटी कर्जत स्थानकावर थांबत होती. पण, आता थांबा बंद केल्याने कर्जत, कल्याण मधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. चिंचवड, कर्जत स्थानकावर जास्तीत-जास्त गाड्यांना थांबा देण्याची नागरिकांची मागणी आहे. नागरिकांच्या सोईसाठी चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.