11th HI Sr. Men Natl C’hip 2021: महाराष्ट्राची गाठ आता तमिळनाडूशी!

एमपीसी न्यूज – यजमान हॉकी महाराष्ट्राला आपली आगेकूच कायम राखण्यासाठी आता 11 व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत तमिळनाडूचे आव्हान पार करावे लागेल. दरम्यान, साखळी गटातील अखेरच्या सामन्यात आज हरियानाने विजय मिळविला.

पिंपरी चिंचवडमधील नेहरुनगर परिसरातील मेजर ध्यानचंद मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने गटातील सर्व सामने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. त्याच वर्चस्वाची पुनरावृत्ती महाराष्ट्राला आता दाखवावी लागणार आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत 32 गोल केले असून, त्यातील 13 गोल चार खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नवर केले आहेत.

तुलनेत तमिळनाडू संघ देखील अपराजित राहूनच बाद फेरीत दाखल होत आहे. फरक फक्त गोल संख्येत आहे. त्यांनी 18 गोल नोंदवले असून, त्यातील फक्त 5 पेनल्टी कॉर्नवर नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्राने तीन गोल स्विकारला आहे, तर तमिळनाडूने अजून एकही गोल स्विकारलेला नाही.

गोल करणाऱ्या खेळाडूंची संख्या बघितली तर त्यात फारशी दूरी नाही. महाराष्ट्राकडून सात, तर तमिळनाडूकडून सहा खेळाडूंनी गोल केले आहेत. महाराष्ट्राचा कर्णधार तालेब शाहने आठ, तर तमिळनाडूच्या सुंदरापंडीने 4 गोल केले आहेत. महाराष्ट्राची ही घोडदौड स्वप्नवत आहे. आजपर्यंतच्या वरिष्ठ गटातील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला अभावानेच यश मिळाले आहे. तुलनेत तमिळनाडूने तीनवेळा तरी पहिल्या दहांत स्थान मिळविले आहे.

प्रतिस्पर्धी संघातील लढतीत 2015 मध्ये महाराष्ट्राने तमिळनाडूवर 3-1 असा विजय मिळविला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत याच मैदानावर हा विजय मिळविला होता. त्यामुळे इतिहास महाराष्ट्राच्या बाजूने आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

अन्य लढतीत दोनवेळचे विजेते आणि तीन वेळचे उपविजेते आणि दोनवेळा तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या पंजाबची गाठ त्यांच्या शेजारील राज्य असणाऱ्या चंडिगडशी पडणार आहे. ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेत्या संघातील रुपिंदरचा सहभाग हे पंजाबचे वैशिष्ट्य राहिल. गतउपविजेते कर्नाटक आपली आगेकूच कायम राखण्यासाठी बंगालशी खेळतील. हरियाना आणि उत्तर प्रदेश ही तिसरी उपांत्यपूर्व लढत होईल.

आज साखळीतील अखेरच्या सामन्यातून मध्यप्रदेशाचा 5-1 असा पराभव करताना हरियानाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ते सहा गुणांसह गटात अव्वल राहिले. हरियानाकडून संजयने दोन, तर जोगिंदर, बॉबी सिंग, दीपक यांनी एकेक गोल केला. पराभूत संघाचा एकमात्र गोल अमिन खान याने केला.

निकाल –

गट ब – हॉकी हरियाना 5 (जोगिंदर 20वे, संजय 24 वे 39 वे, बॉबी सिंग 35वे, दीपत 38वे मिनिट) वि.वि. मध्य प्रदेश 1 (अमिन खान 37वे मिनिट)

आजचे सामने –

  •  पंजाब वि. चंडिगड (दु. 1 वा.)
  • कर्नाटक वि. बंगाल (दु. 3 वा.)
  • हरियाना वि. उत्तर प्रदेश ( सायं. 5 वा.)
  • तमिळनाडू वि. महाराष्ट्र (सायं. 7 वा.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.