Pune News : कोविड 19 च्या डेल्टा व ओमिक्रॉन प्रकारांतील फरक ओळखण्यासाठी भारतीय बनावटीचा चाचणीसंच विकसित

एमपीसी न्यूज – पुण्यातील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या वतीने कोविड 19 च्या डेल्टा व ओमिक्रॉन प्रकारांतील फरक ओळखण्यासाठी ‘कोविडेल्टा’ हा भारतीय बनावटीचा चाचणीसंच (टेस्ट किट) विकसित करण्यात आला असून या एकाच चाचणीद्वारे कोविड विषाणूचा नेमका प्रकार ओळखणे, आता शक्य झाले आहे.

या संशोधनाद्वारे कोविड 19 या संसर्गजन्य रोगाचा नेमका प्रकार ओळखणे सोपे झाले असून अशाच अचूक व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत चाचण्या उपलब्ध करण्याचा आमचा उद्देश असल्याचे सांगत जीनपॅथ डायग्नोस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल जकातदार म्हणाले, या चाचणीसंचाच्या मदतीने जगभरात सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कोविड 19 च्या डेल्टा व ओमिक्रॉन सोबतच या विषाणूच्या इतर प्रकारांची ओळख पटवणे शक्य झाले आहे.

सदर चाचणीसंच हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा असून याद्वारे अगदी कमी वेळेमध्ये विषाणूच्या प्रकाराबद्दल माहिती मिळते. शिवाय हा चाचणीसंच कमी दरात उपलब्ध करून देण्यात आला असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरची मान्यता देखील त्याला मिळाली आहे, असे डॉ. जकातदार म्हणाले.

जीनपॅथ डायग्नोस्टिक्सचे संस्थापक आणि चीफ सायंटिफिक ऑफिसर डॉ. निखिल फडके म्हणाले, या चाचणीसंचाच्या मदतीने पुण्यातील कोविड 19च्या ओमिक्रॉन प्रकाराचा पहिला बाधित रुग्ण आम्ही दाखवून देऊ शकलो. इतकेच नव्हे तर पुढे सदर रुग्ण हा ओमिक्रॉन प्रकारानेच बाधित असल्याची पुष्टी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), आयसर,बी.जे. मेडिकल कॉलेज व पूना नॉलेज क्लस्टर (पीकेसी) सारख्या भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स (INSACOG) कन्सोर्शीयम अंतर्गत येणा-या संस्थांनी देखील केली. सध्या भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सरकारी आणि खाजगी संस्था या कोविड विषाणूच्या प्रकारांच्या निदानासाठी व त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या चाचणीसंचाच्या वापराचे मूल्यांकन करत आहेत.”

या चाचणीसंचाचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे सध्या वेगाने पसरत असलेल्या डेल्टा प्रकारातील बीए 1 व बीए 2 सोबत नवीन येत असलेला बीए 3 आणि ओमिक्रॉन या विषाणूच्या प्रकारातील ठळक फरक ओळखता येतो. सर्व ओमिक्रॉन प्रकारात काही सामाईक उत्परिवर्तन दिसून येते. बीए 2 उपप्रकारात स्पाईक जीन डेल 69-70 उत्परिवर्तन पहायला मिळत नाही. म्हणूनच सर्वत्र करण्यात येणा-या एस- जीन टारगेट फेल्युअर (एसजीटीएफ) चाचणीमध्ये देखील ते समोर येत नाही.

दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशांमध्ये नुकत्याच आढळून आलेल्या रुग्णसंख्येत 70% रुग्ण हे बीए 2 या उपप्रकारातील असून त्यांना एसजीटीएफ चाचणीमध्ये या विषाणू प्रकाराची ओळख पटविण्यास यश आले नाही. मात्र जीनपॅथतर्फे विकसित व आयसीएमआर मान्यताप्राप्त ‘कोविडेल्टा’ या चाचणीसंचात डेल्टा प्रकारात आढळून येणारे मात्र ओमिक्रॉन प्रकारात आढळून न येणारे L452R हे उत्परिवर्तन लक्षात येते. यामुळे सध्या व भविष्यात विषाणू आणि त्याच्या उपप्रकारात होणारे बदल ओळखत डेल्टा व ओमिक्रॉन प्रकारातील फरक समोर आणण्यास ‘कोविडेल्टा’ मदतशीर ठरेल, असेही डॉ. फडके यांनी सांगितले.

जीनपॅथ डायग्नोस्टिक्स विषयी –

डॉ. निखिल फडके यांनी 2008 मध्ये जीनपॅथ डायग्नोस्टिक्स या सरकारमान्य लॅबची स्थापना केली असून आयसीएमआर मान्यता प्राप्त चाचणी संचाचा वापर करून श्वसनाच्या नमुन्यांमधून आरटी – पीसीआर टेस्ट करीत गुणात्मक निष्कर्ष देणे ही या लॅबची ओळख आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळा व संशोधन यामध्येही लॅब कार्यरत आहे. मागील 10 वर्षांमध्ये चिकनगुण्या, डेंग्यू, झिका सारख्या संसर्गजन्य आजारांवर संशोधन करीत जीनपॅथच्यावतीने नोव्हेल मोलेक्युलर डायग्नोस्टिक्स चाचण्यांचे संशोधन देखील करण्यात आले आहे.

जीनपॅथला नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज् (एनएबीएल) ची मान्यता असून जागतिक दर्जाचे संशोधन याबरोबरच तांत्रिक लॅब हे जीनपॅथचे वैशिष्ट्य आहे. भारतात पुण्याबरोबरच, अमेरिका, युएई येथे देखील संस्था कार्यरत आहे. जीनपॅथच्या माध्यमातून संसर्गजन्य रोग ऑन्कोलॉजी आणि अनुवांशिक विकारांसाठी क्लिनिकल मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक्स, जेनोमिक्स टेस्टिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.