Mumbai: कठीण परिस्थितीत उद्योगांनी कामगारांना वाऱ्यावर सोडू नये – मुख्यमंत्री

Mumbai: Industries should not cut workers in tough time says CM uddhav thackeray पुरेशा क्रयशक्तीच्या अभावी अद्याप बाजारपेठांत ग्राहक नसल्याने काहीशी अडचण आहे. परंतु परिस्थिती सुधारत जाईल.

एमपीसी न्यूज- जगभरातच कोरोनाची परिस्थिती विचित्र आहे. आपण सर्वतोपरी प्रयत्न करून या साथीला रोखत असलो तरी जीवन पूर्वपदावर कधी येणार सांगता येत नाही. या कठीण प्रसंगात उद्योगांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये. कारण त्यांच्या उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच भलेही काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल. पण कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका. मी स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.

भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मुंबई आणि पुण्यासारख्या भागात कोरोनाच्या केसेस वाढताहेत. मात्र एप्रिल शेवटापासून आपण ग्रीन आणि ऑरेंज क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना अटी आणि शर्तींच्या अधीन राहून सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

आज अनेक उद्योग त्याठिकाणी सुरु झाले असून कामगारही रुजू झाले आहेत. पुरेशा क्रयशक्तीच्या अभावी अद्याप बाजारपेठांत ग्राहक नसल्याने काहीशी अडचण आहे. परंतु परिस्थिती सुधारत जाईल. आपण कुठेही मालवाहतुकीला थांबवलेले नाही.

माणसांची वाहतूक थांबवली आहे. जेणे करून साथीचा प्रसार होणार नाही. जिथे उद्योग सुरु झाले आहेत तिथे आपण व्यवस्थापन आणि कामगार यांच्या कोविड दक्षता समित्या स्थापन करू शकतो का ते पाहिले पाहिजे. जेणे करून उद्योगांत आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण तयार होईल.

जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका

काही उद्योग आणि व्यवसायांतून नोकर कपात सुरु आहे असे कळते. ते चुकीचे असून कामगारांना नोकरीवरून काढू नका अशी आपली प्रथमपासून भूमिका आहे. मी स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहे.

एकीकडे कारखाने हे परराज्यातील गावी गेलेल्या कामगारांची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक भूमिपुत्र नोकरीसाठी इच्छुक आहे. अशा स्थितीत जे उपलब्ध आहेत. त्यांना लगेच नोकऱ्या द्या आणि व्यवसाय सुरु करा, पण नव्या नोकऱ्या देतांना जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.

औद्योगिक कामगार ब्युरो सुरु

याप्रसंगी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की. औद्योगिक कामगारांच्या नोकरीविषयक तक्रारी तुलनेने कमी आहेत. परंतु सेवा क्षेत्र मात्र अडचणीत आलेले आहे. त्यांचा व्यवसाय सुद्धा कमी झाला आहे.

कंपन्या आणि मालकांसमोर सुद्धा अडचणी आहेत. मात्र कामगार, कर्मचारी याचे कुटुंब चालेल, चूल पेटेल अशी समंजस भूमिका घेणे गरजेचे आहे. मालकांशी सातत्याने संवाद साधून मार्ग काढता येईल. देशातील पहिल्या औद्योगिक कामगार ब्युरोचे उद्घाटन आपण करीत आहोत जेणे करून कुशल, अकुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार मिळेल.

यावेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक, अजित साळवी, मनोहर भिसे, विनोद घोसाळकर, रघुनाथ कुचे, संजय कदम, विजय वालावलकर, मनोज धुमाळ,जीवन कामत, उदय शेट्ये,प्रभाकर मते पाटील आदींनी सूचना केल्या.

काही व्यवस्थापन परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कामगार कपात करीत आहेत, विशेषत: कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत. सेवा उद्योग अडचणीत आहे. सर्व हॉटेल्स मेटाकुटीला आले आहे.

कायम कामगारांवर वेतन कपातीची टांगती तलवार आहे. डिसेंबरपर्यंत ही वेतन कपात करावी असे सांगण्यात येत आहे. हॉटेल्स, आयटी, लॉजिस्टिकमध्ये कामगारांना कमी करणे सुरु आहे, छोट्या कंपन्यांनी तर कपातीचाच मार्ग अवलंबिला आहे, अशा प्रकारच्या अडचणी यावेळी मांडण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.