Pimpri News : महापालिका विनापरवाना जाहिरात फलकांवर करणार कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना जाहिरात फलकाचे पेव फुटले आहे. शहरातील मोठे रस्ते, चौक याठिकाणी विनापरवाना मोठे होर्डिंग्ज लावून जाहिरतबाजी केली जात आहे. शहरातील अशा विनापरवाना होर्डिंग्जवर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकामार्फत कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 2 हजार जाहिरात फलक आहेत. त्यापैकी केवळ 500 होर्डिंग्ज हे अधिकृत आहेत. उर्वरित होर्डिंग्ज हे विनापरवाना, परवाना नूतनीकरण तसेच शुल्क न भरलेले आहेत. शहरात विकसित झालेल्या भागात तसेच, प्रशस्त रस्ते तयार झालेल्या भागात मोठ्या प्रमाणात विनापरवाना होर्डिंग्ज लावले जात असल्याचे चित्र आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना होर्डिंग्ज वाढून शहराला बकालपणा येत आहे.

क्षेत्रीय अधिकारी आणि आकाशचिन्ह परवाना विभागाचे निरीक्षक यांचे स्वतंत्र पथक स्थापन करून शहरातील होर्डिंग्जचे 7 दिवसांत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी एक स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित केले आहे. त्यावर नोंदी करून होर्डिंग्जवर आकारमान, अधिकृत की अनधिकृत आदी नोंदी केल्या जातील. त्यानंतर विनापरवाना होर्डिंग्जवर पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाईल. ती कारवाई 8 क्षेत्रीय समितीच्या पथकांकडून एकाच वेळी केली जाणार आहे. त्यापूर्वी कोणत्या भागात कारवाई केली जाणार आहे, ते महापालिका प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे संबंधितांना होर्डिंग्ज काढून घेण्यास वेळ मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.