Pimpri News : महापालिका उद्यान विभागाची RTI अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ, राज्य मानव आयोगाकडे तक्रार करणार – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नगररचना व विकास विभाग, अ क्षेत्रीय कार्यालयाने माहिती अधिकार कायद्या (आरटीआय) अंतर्गत विभागातील वाहनचालकांच्या मासिक वेतनाची माहिती दिली असताना महापालिकेचा उद्यान विभाग वाहनचालकांच्या वेतनाची वैयक्तीक माहिती असल्याचे सांगत माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. याविरोधात राज्य मानव आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी सांगितले.

उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाकडे अधिकारी वर्गासाठी असलेल्या एकूण शासकीय वाहनांची संख्या, या वाहनांवरील देखभाल दुरुस्ती, इंधनावरील खर्च, चालकांचे वेतन, रस्ते वाहतूक शिस्त, ट्राफिक वॉर्डन नियुक्ती प्रशिक्षण वेतन, कोरोना काळात विनामास्क वसुलीचा दंड, अतिक्रम कारवाई याची माहिती प्रदीप नाईक यांनी आरटीआय अंतर्गत मागविली होती. त्याला उत्तर देताना प्रभारी उद्यान अक्षीक्षकांनी म्हटले आहे की, वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चाची माहिती विभागाशी संबंधित असून गुलाबपुष्प उद्यान येथे येऊन घेऊन जावे. चालकांची वेतनाची माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 8 पोटकलम (त्र) नुसार वैयक्तीक स्वरुपाची असल्याने देता येत नाही. उर्वरीत मुद्दे उद्यान विभागाशी संबंधित नसल्याचे कळविले.

महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक म्हणाले, ”वाहनचालकांच्या वेतनाची माहिती वैयक्तीक असल्याचे सांगत उद्यान विभागाने ती देण्यास नकार दिला. सरकारी कर्मचा-याची माहिती वैयक्तीक कधीच नसते. अधिका-यांचे सेवा पुस्तक देखील माहिती अधिकारात मागू शकतो. अ प्रभागातील अधिका-यांनी वाहनचालकांच्या मासिक वेतनाची माहिती दिली. मग, उद्यान विभाग वैयक्तीक माहिती असल्याचे सांगत वेतनाची माहिती देण्यास टाळाटाळ का करत आहे. याबाबत आपण राज्य मानव आयोगाकडे दाद मागणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.