NCB Interrogates Rhea: रियाची अंमली पदार्थविरोधी पथकाकडून चौकशी

रियाच्या मोबाइलमधील जुने डिलीट केलेले चॅट पुन्हा समोर आणण्यात आले आहे. त्यात अनेक आक्षेपार्ह उल्लेख सापडले असल्याचे समोर आले आहे.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर बुधवारी केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी नॉर्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे.

मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश माने शिंदे यांच्यामार्फत केला.

रियाच्या मोबाइलमधील जुने डिलीट केलेले चॅट पुन्हा समोर आणण्यात आले आहे. त्यात अनेक आक्षेपार्ह उल्लेख सापडले असल्याचे समोर आले आहे. यानुसारच रियाच्या अंमली पदार्थ सेवनाविषयी चौकशी केली जाणार आहे.

या विषयी बोलताना रियाचे वकील अ‍ॅड. सतीश माने शिंदे म्हणाले की, रियाने आजवर अंमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासही ती तयार आहे.

आर्थिक गैरव्यवहार, हत्या, आत्महत्या, अंमली पदार्थविषयक तपास करण्यास सीबीआय सक्षम आहे. मात्र हे पहिलेच प्रकरण असावे, ज्यात सीबीआयला एनसीबीचे सहकार्य आवश्यक वाटले, असे सांगत अ‍ॅड. माने शिंदे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केलेल्या आर्थिक अफरातफरीच्या आरोपाबाबत ईडीने रिया, तिचे वडील इंद्रजीत, भाऊ शोविक, व्यवस्थापक श्रुती मोदी, सॅम्युअल मिरांडा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला.

मिळालेल्या माहितीनुसार तपासादरम्यान रियाने भ्रमणध्वनीतून काढून टाकलेले (डिलीट केलेले) व्हॉट्सअ‍ॅप संदेश पुन्हा प्राप्त केले. यात अंमली पदार्थाबाबतही संवाद आहेत. या संदेशांबाबत ईडीने सीबीआयसह एनसीबीलाही माहिती दिली. सीबीआयच्या तपासात सुशांतचा आचारी नीरज सिंह यानेही अंमली पदार्थाशी संबंधित माहिती जबाबात दिली.

सीबीआयच्या विशेष पथकाने सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानी याची सलग सहाव्या दिवशी चौकशी केली. बुधवारी सिद्धार्थ, आचारी नीरज, नोकर दीपेश सावंत यांची पथकाने दिवसभर चौकशी केली. तसेच सुशांत वास्तव्यास होता त्या इमारतीच्या सुरक्षारक्षकालाही पथकाने दुपारी चौकशीसाठी बोलावले होते. 8 जूनला रियाने सुशांतचे घर सोडले. त्याच दिवशी सुशांतच्या घरातील आठ हार्डड्राईव्हची विल्हेवाट लावण्यात आली, अशी कबुली सिद्धार्थ, दीपेश यांनी दिली.

दीपेश माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सीबीआय प्रवक्ते आर. के. गौर यांनी या घडामोडींबाबत माहिती मिळालेली नाही. खातरजमा करुन माध्यमांना कळवू, असे सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.