Pimpri Smart City News : प्रतिकात्मक आंदोलनातून शिवसेना – राष्ट्रवादीने किरीट सोमय्यांना दिली चपराक; ईडीकडे तक्रार करण्याचे आव्हान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील घोटाळ्याची तक्रार ईडीकडे करण्याचे आव्हान दिल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थयथयाट केला. याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने त्यांच्याविरोधात आज (शुक्रवारी) महापालिकेत उपरोधिक आंदोलन करून घेतला. प्रतिकात्मक किरीट सोमय्या यांच्याकडे स्मार्ट सिटीतील घोटाळ्याची फाईल उपरोधिकपणे सुपूर्द करत ईडीकडे तक्रार करावी. चौकशी लावण्याची हिम्मत दाखविण्याचे आव्हान दिले.

महापालिका मुख्यालयातील महापौर दालनासमोर झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले, शिवसेनेच्या शिरुर संघटिका सुलभा उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, विक्रांत लांडे, राजेश वाबळे, धनंजय आल्हाट आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

सुलभा उबाळे म्हणाल्या, महापालिकेत स्मार्ट सिटीच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाने करदात्यांच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांचीच कंपनी असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ही लूट झाल्याचे कागदोपत्री पुरावे सांगतात.

राज्यभर ईडी, सीबीआय च्या माध्यमातून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्यांना या प्रकरणांबद्दल पत्र दिले असता त्यांची अक्षरशः बोबडी वळली अन तोंड बंद झाले आहे. आता शिवेसना आपल्या पध्दतीने या भोंदू किरीट सोमय्या यांच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा फाडणार आहे. महापालिका आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी अन्यथा शिवेसेना आगामी काळात याहीपेक्षा तडाखेबंद आंदोलन करणार, असल्याचा इशारा उबाळे यांनी दिला आहे.

संजोग वाघेरे म्हणाले, “स्मार्ट सिटीतील खरेदी बाजारभावापेक्षा चार पटीने अधिक दराने केली आहे. किरीट सोमय्या यांना जाग यावी. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावर लक्ष द्यावे. यासाठी आंदोलन केले”.

शहरप्रमुख सचिन भोसले म्हणाले, ”राज्यातील प्रत्येक गोष्टीच्या भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या किरीट सोमय्या यांनी पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटीच्या कामांवर बोलावे. या चुकीच्या कामांची तक्रार ईडीकडे करावी आणि चौकशीची आग्रही मागणी धरावी अशी आमची मागणी आहे”.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, “स्मार्ट सिटीमध्ये पदोपदी प्रत्येक कामात भ्रष्टाचार झालेला आहे. नियमानुसार चुकीच्या कामांना संचालक जबाबदार आहे. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी शहरातील आमदारांना ‘फ्री हँड’ दिल्यामुळे मुंबईतील एका आमदाराला हाताशी धरून पिंपरी-चिंचवडमधल्या करदात्यांची स्मार्ट सिटीच्या माध्यमातून लूट केली आहे. वारंवार भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या किरीट सोमय्या यांना पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारही दिसावा यासाठी हे आंदोलन केले आहे”.

दरम्यान, स्मार्ट सिटीतीत जे मुद्दे उबाळे यांनी उपस्थित केले होते. त्यावर 14 ऑक्टोंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. त्या अनुशंगाने पुन्हा या सर्व विषयांकडे वेधण्यासाठी उबाळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना गुरुवारी (दि.21) एक लेखी निवेदन दिले आहे.

त्यात निविदेच्या कामाची मुदत किती होती, कितीवेळा मुदतवाढ दिली व ती का दिली तसेच नियमानुसार दंड लावला का, मूळ अंदाजापेक्षा 500 पट जादा दराने पाणी मीटर खरेदी कशी केली, 10 टक्के दंडाची अट 1 टक्के शिथिल करण्याचा निर्णय का केला अशी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. सर्व कामाचे आता ऑडिट करण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.