New Delhi: देशात 2,650 सक्रिय कोरोनाबाधित, मृतांची संख्या 68 वर, 183 झाले कोरोनामुक्त!

एमपीसी न्यूज – देशभरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन हजारांच्या आसपास पोहचली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार देशात 2 हजार 650 सक्रिय कोरोनाबाधित देशातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण 183 रुग्ण उपचारांनंतर कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात एकूण ६८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

‘कोविड 19 इंडिया डॉट ऑर्ग’ या वेबसाईटवर उपलब्ध असलेली आकडेवारी अधिक काळजी करायला भाग पाडणारी आहे. या वेबसाईटने संकलित केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत भारतात एकूण 3 हजार 127 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी 86 जणांचा मृत्यू झाला असून 229 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. त्यामुळे आता राज्यात 2 हजार 812 सक्रिय कोरोनाबाधित विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. राजस्थानमध्ये आज नवीन 17 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. गोवा आणि आसाममध्ये देखील प्रत्येकी एक नवीन रुग्ण सापडल्याने देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत आज 19 ने वाढ झाली आहे.

भारतात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात एकूण 490 कोरोना पॉझिटीव्ह आढळले. त्यापैकी 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 50 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 414 रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. राज्यात सर्वाधिक म्हणजे 198 कोरोनाधित मुंबईत आहेत. पुण्यात 63, सांगली 25, अहमदनगर 19, नागपूर 12, ठाणे 10, बुलडाणा 6, यवतमाळ 4, मुंबई उपनगर 4, सातारा 2, कोल्हापूर 2, रत्नागिरी 1, नाशिक 1, जळगाव 1, गोंदिया 1, औरंगाबाद व अन्य ठिकाणी 140 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

देशात महाराष्ट्राच्या खालोखाल तमिळनाडूमध्ये 411, दिल्ली 386, केरळ 285, तेलंगणा 229, राजस्थान 196, उत्तरप्रदेश 174, आंध्रप्रदेश 164, मध्यप्रदेश 154,  कर्नाटक 128  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.