Nigdi : खासदार प्रितम मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करणा-या शिक्षकाच्या निलंबनाची मागणी (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – बीड लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विषयी फेसबुक पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट करणा-या शिक्षक संजय कु-हाडे यांचे निलंबन करण्याची मागणी भाजप महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्षा शैला मोळक यांनी केली.

शैला मोळक यांनी याबाबतचे पत्र कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा विद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी इथापे यांना दिले. यावेळी उमा खापरे, संगीता सुतार, अरुणा घोळवे, सारिका चव्हाण, रेखा कडाली, सविता कर्वे, राधिका बोर्लीकर, शोभा भराटे, माधवी इनामदार, राजश्री जायभाय, पल्लवी वाल्हेकर, अश्विनी औसेकर, अश्विनी दाभाडे आदी उपस्थित होते.

प्राचार्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील प्रेरणा विद्यालयातील सहशिक्षक संजय कु-हाडे याने आमदार पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवर खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्याबाबत अश्लील कमेंट केली. महिलांच्या सुरक्षेबाबत समाजात चर्चा झडत असताना अशा प्रकारच्या कमेंट करणे चुकीचे आहे. प्रेरणा विद्यालयातील सहशिक्षकाने केलेल्या या कृत्याबद्दल त्याला तात्काळ संस्थेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पत्रात केली.

काय आहे प्रकरण ?

आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सवामध्ये महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर मंत्री पंकजा मुंडे यांनी मध्यंतरी एक ‘राम कदम केवळ बोलले. ते तसे काही करत नाहीत, करणार नाहीत’ अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर वर केली. या पोस्टवर पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षक असलेल्या संजय यांनी कमेंट केली. त्यामध्ये ‘तुमची बहीण खासदार प्रितम मुंढे अविवाहित आहे, तिला पळवून नेले तर चालेल का? अशा आशयाची पोस्ट केली. त्यावर आरोपींनी संजय आणि त्यांच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून त्यावर अश्लील कमेंट्स केल्या.

यानंतर शनिवारी (दि. 8) सकाळी साडेअकराच्या सुमारास संजय यांना मुंढे समर्थकांनी निगडी येथील निवेदिता बँकेसमोर बोलावून घेतले. फेसबुक लाईव्ह सुरू केलं. आधी पोस्ट केलेल्या वक्तव्याची माफी मागायला लावली आणि मग शिवीगाळ करत मारहाण केली होती. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=JJzKEua-yxQ&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.