Dapodi Crime News : घरगुती गॅस चोरीप्रकरणी नऊजण अटकेत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने दापोडी येथे छापा मारून कारवाई केली. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच तीन गॅस एजन्सी चालक व जागामालक यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 26) सकाळी पावणे दहाच्या सुमारास बॉम्बे कॉलनी, दापोडी येथे करण्यात आली.

गॅस रिफिल करणारा नागेंद्रपाल योगेन्‍द्रपाल सिंह (वय 28), छोटू श्रीभगवान बघेल (वय 19), कामगार करतार छोटेलाल सिंह (वय 26), राजेंद्रसिंग जोरसिंग सिंह (वय 40), टेम्पो चालक हरिकांत रौतान सिंह तोमर (वय 33), हरिशंकर धनीराम सिंह (वय 22), आकाश शेर सिंह (वय 19, रा. बॉम्बे कॉलनी दापोडी), देविदास तुळशीराम बिरादार (वय 53, रा. शितोळे नगर, सांगवी), विष्णू बब्रुवान पवार (वय 23, रा. जुनी सांगवी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्यासह बंटू सिंह (वय 30, पूर्ण नाव माहीत नाही), जागा मालक वसंत खेमाजी काटे (वय 65, दोघेही रा. बॉम्बे कॉलनी दापोडी), तसेच कांकरिया एचपी गॅस एजन्सी, वंदना भारत गॅस एजन्सी, देगलूरकर भारत गॅस एजन्सीचे चालक व मालक यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस नाईक मारुती करचुंडे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून कमर्शिअल गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरून गॅसची चोरी होत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपींनी गॅस एजन्सीकडून अतिप्रमाणात गॅस साठा घेऊन घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून धोकादायकरित्या कमर्शिअल सिलेंडरमध्ये गॅस भरत गॅसची चोरी करून ग्राहकांची फसवणूक करत होते.

दरम्यान, आरोपी वसंत काटे याने गॅस चोरी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तसेच कांकरिया एचपी गॅस एजन्सी, वंदना भारत गॅस एजन्सी, देगलूरकर भारत गॅस एजन्सीचे चालक व मालक यांनी रिकामे गॅस सिलेंडर गोडाऊनमध्ये जमा करून न घेताच तसेच भरलेले गॅस सिलेंडर ग्राहकांना वितरित केले जातात किंवा नाही याची खातरजमा देखील केली नाही.

पोलिसांनी या कारवाईत आठ हजार 240 रुपये रोख, तीन लाख 44 हजार 754 रुपये किमतीचे गॅस सिलेंडर व साहित्य, तीन लाख 25 हजार रुपये किमतीचे सहा टेम्पो, वीस हजार रुपये किमतीची एक दुचाकी, असा सहा लाख 97 हजार 994 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.