Pimpri News : शहर भाजपला पडला स्व. गोपीनाथ मुंडे यांचा विसर; जयंतीदिनी एकही कार्यक्रम नाही

एमपीसी न्यूज – भाजपची बहुजनांचा पक्ष अशी ओळख निर्माण करणारे, पिंपरी-चिंचवड शहरात भाजप रुजविणारे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा शहरातील नेत्यांना विसर पडल्याचे दिसून आले. मुंडे यांच्या जंयतीदिनी महापालिकेत सत्ताधीश असलेल्या भाजपने एकही सार्वजनिक कार्यक्रम घेतला नाही. आदरांजलीचा साधा एक फलकही लावला नाही. स्वत:चे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे करणाऱ्यांना आपला पक्ष तळागाळात रुजवणा-या नेत्याची आठवण राहू नये हे मोठे दुर्दैव असल्याची चर्चा आहे. शहर भाजप म्हणजे केवळ उगवत्या सुर्याला नमस्कार घालणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पिंपरी-चिंचवड शहरावर विशेष प्रेम होते. महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असताना भाजपच्या कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ देण्यासाठी, भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होताच मुंडे शहरात दाखल होत असे. आज भाजपमध्ये असेलेले त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीत होते. त्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना मुंडे यांनी मोठे पाठबळ, प्रेरणा दिली.

अनेकांना पदे दिली. सर्वांना सुख, दुःखात साथ दिली. त्यांच्यामुळेच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप तग धरुन राहिला. पक्ष संघटन वाढले. ओबीसी समाजावर त्यांचा मोठा पगडा होता. ओबीसी समाज भाजपच्या पाठिशी उभा करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. लोकमान्य नेता अशी त्यांची ओळख होती. मुंडे यांची 12 डिसेंबर रोजी जयंती होती. त्यानिमित्त शहर भाजपने एकही सार्वजनिक कार्यक्रम घेतला नाही.

राज्यात सत्ता असताना शहरात खासदारकी सोबत काहींची महामंडळावर वर्णी लागली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. दोन आमदार आहेत. अनेक नगरसेवक आहेत. असे असताना शहरातील कोणालाही मुंडे यांच्या जयंतीची आठवण झाली नाही. स्वत:चे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे झाले. पण, मुंडे यांना अभिवादन करण्याचा एकही फलक देखील कोणी लावू शकले नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

शहरातील भाजप पदाधिका-यांचे राजकारणात सोयीस्कररित्या कृतघ्न होणे योग्य नाही असे धुरीणांचे मत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात मुंडे यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव झाला होता. पण, महापालिकेतील सत्तेची पंचवार्षिक संपत आली. तरीसुद्धा ठरावाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी देऊन राज्याच्या राजकारणातून बाजूला केल्याचे जाणवते. त्यामुळे मुंडे समर्थकांनी उगवत्या सुर्याला नमस्कार करून नवीन नेतृत्व स्वीकारले आहे का? असा प्रश्न मुंडे यांच्या चाहत्यांना पडला असल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे संघटन एवढे मोठे झाले आहे की आता जयंत्ती पुण्यतिथी साजरी करण्याची पक्षाला आवश्यकता राहिली नाही. कार्यकर्त्यांचे जीवन श्वानासारखे झाले आहे. सत्तेच्या धावपळीतील वर्तुळात काही कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया भाजपच्या एका कार्यकर्त्याने दिली.

याबाबत बोलताना भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे म्हणाले, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पक्ष कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आम्ही दरवर्षी गोपीनाथ गडावर परळीत जातो. मी तिकडे गेलो होतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.