Chikhali Crime News : कंटेनर चालकाशी हुज्जत घालणा-या टोळक्याचा व्हिडिओ काढल्याने दोघांना मारहाण; एकास अटक

एमपीसी न्यूज – कंटेनर चालकाशी हुज्जत घालणा-या टोळक्याचे दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी शूटिंग काढले. त्यावरून टोळक्याने शूटिंग काढणा-या दोघांना मारहाण करून लुटले. ही घटना शनिवारी (दि. 11) चिखली येथे घडली.

शुभम, बारक्या, आंब्या, नौशाद अकबरअली शहा (वय 20, रा. महादेव नगर, लोंढे वस्ती, चिखली) आणि त्याचे दोन साथीदार (नाव पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रोहित श्रावण शिंदे (वय 21 रा. रुपीनगर, तळवडे) असे दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 13) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी रोहित शिंदे आणि त्यांचा मित्र बिभीषण बंडगर असे दोघेजण पेट्रोल भरण्यासाठी देहू आळंदी रस्त्यावर चिखली येथे आले होते. देहू गावकडे जाणाऱ्या रोडवर चार-पाच मुले एका कंटेनरला रस्त्याच्या मधोमध अडवून ड्रायव्हर सोबत हुज्जत घालत होते.

फिर्यादी शिंदे यांनी या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग काढले. शूटिंग काढत असताना हुज्जत घालणाऱ्या मुलांपैकी एकाने फिर्यादी यांच्याकडे पाहून शुभम, बारक्या, आंब्या बघा तो मुलगा शूटिंग काढत आहे, असे म्हणून फिर्यादी जवळ येऊन मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र फिर्यादी यांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यांच्या खिशातील एक हजार 800 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी शिंदे हे पळून जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यावेळी लांब केस असलेल्या एका मुलाने फिर्यादी यांच्या पायाच्या नडगीवर लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ‘याला सोडून नको’, अशी धमकी दिली. चिखली पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.