Pimpri News : अधिकारी, कर्मचा-यांनो! मालमत्तांची माहिती द्या, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वर्ग 1 ते 3 मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतः आणि कुटुंबाच्या मालमत्तांचे विवरण पत्र 31 मे 2022 अखेरपर्यंत प्रशासनाला सादर करावे. तसेच विवरण पत्र सादर न केल्यास भविष्यात मिळणारी पदोन्नती किंवा प्रतिनियुक्ती देण्यात येणार नाही. त्याचबरोबर शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात येईल असा  इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

राज्य सरकारच्या नियमानुसार महापालिकेतील ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मालमत्तांची आणि दायित्वाची दरवर्षी महापालिकेला माहिती सादर करणे बंधनकारक आहे. विवरण पत्र नसल्यास पदोन्नती किंवा सुधारित सेवाअंतर्गंत आश्‍वासित प्रगती योजनांच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात येईल. पदोन्नती, प्रतिनियुक्ती, विदेश दौऱ्यास विवरण पत्र असेही गरजेचे आहे. वर्ग-1 आणि वर्ग-2 मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 31 मे अखेर मालमत्ता विवरण पत्रांची बंद पाकिटातून माहिती सादर करावी.

वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांनी संगणक क्रमांक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, मालमत्ता विवरण पत्र सादर केले आहे काय? अशाप्रमाणे माहिती सादर करावी. मुदतीत विवरण पत्र सादर न केल्यास हे गैरवर्तन मानण्यात येणार आहे. तसेच अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.