HSC Exam 2022 : आजपासून 12 वीची ऑफलाईन परीक्षा सुरू; जाणून घ्या परीक्षेचे आयोजन

एमपीसी न्यूज कडून एचएससीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

एमपीसी न्यूज – एचएससी अर्थात बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिक्षा आजपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रांवर 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, इतर परीक्षांप्रमाणे गैरव्यवहार टाळण्यासाठी भरारी पथकांची आवर्जून नेमणूक करण्यात आली आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या या ऑफलाईन परीक्षेचे आयोजन कसे असेल याची नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. 

कोरोना संकट काहीसे कमी झाल्याने यंदा बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर आहे. ऑनलाईनमुळे लिखाणाचा सराव खुंटल्याने या परीक्षेत लिखाणासाठी विद्यार्थांना वेळ थोडी वाढवून मिळणार आहे. म्हणजेच 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे, तर 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटांची वेळ असे आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षण मंडळाकडून परीक्षेसंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून आयोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. परिक्षेसाठी एका हाॅल मध्ये 25 विद्यार्थी झिगझॅग पद्धतीने बसवण्यात येणार आहेत. विद्यार्थांच्या मनावर ताण येऊ नये, तयारीसाठी आणखी वेळ मिळावा म्हणून महत्त्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये विचारपूर्वक अंतर ठेवण्यात आले आहे.

परीक्षेदरम्यान काही गैरप्रकार घडू नये यासाठी संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी भरारी पथके, दक्षता समितींची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये विशेष महिला भरारी पथक आणि शिक्षण विभागातील विशेष अधिकारी सुद्धा वेळोवेळी परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.

 जाणून घ्या बारावी परीक्षेच्या आयोजनाचे स्वरूप –

  • परीक्षेच्या वेळेनुसार सकाळी घंटा वाजवली जाणार आहे.
  • जेव्हा उत्तरपत्रिकेचे वाटप होईल तेव्हा दोन टोल वाजवले जातील.
  • प्रश्नपत्रिका वाटप करताना एक टोल वाजेल तसेच शेवटची दहा मिनिटे बाकी असताना एक टोल आणि लेखन समाप्तीसाठी शेवटचा टोल वाजवला जाईल.
  • एका हाॅलमध्ये केवळ 25 विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था, कोरोना संकट लक्षात घेता झिगझॅग पद्धताने विद्यार्थांना बसावे लागणार आहे.
  • विद्यार्थांचा विचार करून त्यांना लिखाणासाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे तसेच महत्त्वाच्या पेपर मध्ये योग्य अंतर ठेवण्यात आले आहे.
  • परीक्षा केंद्रांच्या आवारातील झेराॅक्स सेंटर, ध्वनिक्षेपक बंद राहणार आहेत.
  • परीक्षेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, कायदा व्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर कलम 144 मनाई आदेश लागू करण्यात आले आहे असून परीक्षेच्या आयोजनाचे हे स्वरूप मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

विद्यार्थांना पुन्हा एकदा परीक्षेसाठी शुभेच्छा!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.