Lonavala : मावळ तालुक्यात रविवारचा दिवसच उजाडला वाहतूक कोंडीने

वर्षाविहाराकरिता पर्यटकांची सकाळपासूनच गर्दी

एमपीसी न्यूज – वर्षा विहाराकरिता रविवारी सकाळपासूनच पर्यटकांनी मावळ तालुक्यातील लोणावळा व खंडाळ्यासह नाणे मावळ, आंदर मावळ व पवन मावळात गर्दी केल्याने मावळ तालुक्यात रविवारचा दिवसच वाहतूक कोंडीने उजाडली. बारा वाजण्यापूर्वीच भुशी धरण ते लोणावळा कुमार चौक दरम्यान सहा किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा तिन ते चार किमी अंतरापर्यंत दोन ते तीन पदरी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कार्ला फाटा येथे सकाळीच वाहतूक कोंडी झाल्याने कार्ला लेणी व भाजे लेणीकडे जाणारे मार्ग ठप्प झाले होते. आंदर मावळात वडेश्वरकडे जाणार्‍या मार्गावर सकाळीच चार ते पाच किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर पवन मावळातील मुख्य चौकातून मार्ग काढणे मुश्किल झाले होते.
वाहतूक कोंडीमुळे अनेक पर्यटकांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचता न आल्याने त्यांचा आजचा दिवस वाहतूक कोंडीतच गेला. मावळ तालुक्यात रस्त्याच्या क्षमतेच्या काही पटीने पर्यटक व त्यांची वाहने दाखल झाल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. आंदर मावळातील रस्ते अरुंद असल्याने या भागात झालेल्या कोंडीचा व पर्यटकांच्या हुल्लडबाजीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. पर्यटनामुळे स्थानिकांना त्रास होणार असेल तर असे पर्यटन आम्हाला नको अशा भावना या भागातील नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

लोणावळ्यातील पर्यटनस्थळे आज हाऊसफूल झाली होती. भुशी धरण व लायन्स पॉईंटकडे जाण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागत असल्याने पर्यटक हैराण झाले होते. धरण परिसरात अक्षरशः पाय ठेवायला जागा शिल्लक राहिली नव्हती. आज पर्यटक‍ांमध्ये दुचाकीवरून आलेले पर्यटक व रेल्वेने येऊन पायी धरण भागात जाणार्‍यांची संख्या अफाट होती. खंडाळ्यात देखील वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पवन धरण परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने मुळातच लहान आकाराचव येथील रस्ते वाहतूक कोंडीमय झाले होते. लोणावळा व मावळ तालुक्यात दर शनिवार व रविवारी होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी जोर धरु लागली आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.