Lonavala : क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेणा-या एकाला अटक; सहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – भारत विरुद्ध न्यूझीलंड या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेतल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर सट्टा लावणा-या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणावळा येथील हॉटेल रॉयल दरबार येथे केली.

भाविन सामजी आनम (वय 38, रा. मुळेबाई चाळ, गोसला रोड, मुलुंड वेस्ट, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर दया भानुशाली (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), चेतन प्रभुदास झाला (वय 46, रा. सेक्टर 20, खारघर, नवी मुंबई), निरव रमानी (रा. मुलुंड), माॅन्टू जैन (रा. मुलुंड), शशी गुलाब आजवानी (रा. कुमुदनी बिल्डिंग, दिव्यदयाल रोड, मुलुंड वेस्ट, मुंबई), सुनील महेंद्र जैस्वाल (रा. आयसीसी क्लब जवळ, मीरा रोड, ठाणे) यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू यांना माहिती मिळाली की, लोणावळा येथील हॉटेल रॉयल दरबार येथे एका खोलीमध्ये एक इसम भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हॉटेल रॉयल दरबारवर छापा मारून आरोपी भाविन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन मोबाईल फोन, एक रजिस्टर असा ऑनलाईन सट्टा लावण्याचा एकूण 14 हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. पोलिसांनी हा ऐवज जप्त करत आरोपीला अटक केली.

आरोपी भाविन यांच्याकडे ऑनलाईन सट्टा लावणा-या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. यामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू, पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, सहाय्यक पोलीस फौजदार विजय पाटील, सुनील बांदल, दिलीप जाधवर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश वाघमारे, मोरेश्वर इनामदार, दयानंद लिमण, पोलीस नाईक गणेश महाडिक, चंद्रकांत जाधव, ज्ञानदेव क्षीरसागर, विशाल साळुंखे, अक्षय नवले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.